सफाईवरून राडा होताच महापौरांनी सभा गुंडाळली

सफाई ठप्प पडल्याने संतापलेल्या नगरसेवकांचा घेराव

सफाई वाहने घटल्याने सर्वत्र कचर्‍याचे मोठे साम्राज्य
कंत्राटदाराच्या कारभाराला अधिकार्‍यांचेच पाठबळ

अमरावती /19 ऑक्टोबर – ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरात कचर्‍याचे साम्राज्य पसरल्याने सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी जाब विचारताच महापौरांनी कोणतीही चर्चा न करता सभा तडकाफडकी तहकूब केली. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांना गाठून सुरक्षा रक्षकांचे कडे तोडत त्यांना चांगलेच धारेवर धरले. एका बाजूला निकृष्ट कामाबद्दल नोटीस बजावायची आणि दुसर्‍या बाजूला त्याच कंत्राटदाराची न्यायालयात पाठराखण करायची असा दुटप्पी कारभार सुरू असल्याचा थेट आरोप करत नगरसेवकांनी संपूर्ण प्रशासन ठेकेदाराच्या दावणीला बांधल्याचा गंभीर संताप व्यक्त केला.ऐन सणांच्या तोंडावर प्रभागांमधील कचरा उचलण्याची व्यवस्था पार कोलमडल्याने आज महापालिकेच्या आमसभेत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. आचारसंहितेचे कारण पुढे करून आजच्या सभेत कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही प्रभाग स्वच्छतेचा बोजवारा उडाल्यामुळे नगरसेवक धीरज हिवसे, चंदू खेडकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनासमोर प्रभागातील घाणीचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. स्वतः महापौरांच्या प्रभागात कचर्‍याचे ढीग साचलेले असताना ते नागरिकांना काय न्याय देणार असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला.
प्रभागात दररोज कचरा उचलण्यासाठी ठरवून दिलेल्या संख्येत गाड्या पाठवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ 1 किंवा 2 गाड्या पाठवून कशीबशी वेळ मारून नेली जात आहे. कंत्राटदाराच्या मनमानी कारभारापुढे प्रशासन पूर्णपणे हतबल झाल्याचे चित्र शहरात उभे राहिले आहे. शहराच्या स्वच्छतेचे काम कोणार्क कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. ही कंपनी आधीच वादाच्या भोवर्‍यात सापडली असून उच्च न्यायालयाने तिचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कंत्राटावर टांगती तलवार असल्याने कंपनीने थेट सफाई खर्चात कात्री लावली असून अनेक प्रभागांत रोज कचरा उचलणार्‍या गाड्या पोहोचतच नाहीत. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत सर्वत्र कचर्‍याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे आणि प्रभागातील नागरिक नगरसेवकांवर आपला रोष व्यक्त करत आहेत.
या गंभीर समस्येवर नगरसेवकांनी जाब विचारण्याचा प्रयत्न करताच महापौरांनी सभा अचानक तहकूब करून टाकली. यामुळे संतापाचा पारा चढलेल्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या दिशेने धाव घेतली. आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षा कडे तयार केले. अखेर वाढता रोष पाहून महापौरांच्या दालनात सर्व पदाधिकार्‍यांची तातडीची बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीत नगरसेवकांनाच आपापल्या प्रभागात सफाईची व्यवस्था पाहण्याचा अजब सल्ला देण्यात आला.
या सल्ल्याने नगरसेवक अधिकच भडकले. आम्ही लोकांचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत, कोणाचे कंत्राटदार नाही, अशा शब्दांत त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना चांगलेच खडे बोल सुनावले.

Back to top button