चांदुरबाजारात तरुणाची हत्या

सांडपाण्याच्या पाईपवरून वाद विकोपाला

धारदार शस्त्राने केले सपासप अनेक वार
दिवसाढवळ्या हत्याकांडाने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत

चांदूरबाजार /21 ऑक्टोबर  – दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 38 वर्षीय तरुणाला भररस्त्यात दुचाकीवरून आलेल्या मारेकर्‍यांनी अडवून धारदार शस्त्राने सपासप वार करून जागीच संपवल्याची थरारक घटना चांदूरबाजार येथे घडली असून सांडपाण्याच्या पाईपावरून झालेल्या जुन्या भांडणातून हा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार जवळच्या शिरजगाव बंड येथील रहिवासी वसीम खान शहादत खान, वय 38 वर्षे, हे नेहमीप्रमाणे सकाळी दूध आणण्यासाठी दुचाकीने शहराकडे निघाले होते. ते मुख्य रस्त्यावर येताच मागून भरधाव वेगाने दुचाकीवर आलेल्या अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांची दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले. काही समजण्याच्या आतच मारेकर्‍यांनी सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर अमानुषपणे सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात वसीम खान हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले आणि त्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर हा भयंकर प्रकार घडल्याने बाजारात एकच पळापळ उडाली. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मृत वसीम खान यांचे शेजारी राहणारे आर्यन रहमत खान यांच्याशी आदल्या दिवशी मंगळवारी घरासमोर असलेल्या सांडपाण्याच्या पाईपावरून जोरदार वाद झाला होता. या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रुपांतर काही वेळातच बाचाबाची आणि हाणामारीत झाले होते. दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांना भिडले होते. त्यावेळी तेथे जमलेल्या गावकर्‍यांनी मध्यस्थी करून कसेबसे हे भांडण मिटवले होते. मात्र दुसर्‍याच दिवशी सकाळी वसीम खान यांच्यावर थेट जीवघेणा हल्ला झाल्याने हा खून पाईपाच्या जुन्या वादातूनच झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. किरकोळ वादातून थेट खून झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी चांदूरबाजार उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि संतप्तनागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. भरदिवसा घडलेल्या या अमानुष हत्येमुळे संपूर्ण चांदूरबाजार तालुक्यात खळबळ उडाली असून मारेकर्‍यांना तात्काळ पकडून गजाआड करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे

Back to top button