नवरात्रीच्या पर्वावर अडीच दिवसासाठी विराजमान होते ‘ईना माय’
मातंग समाजाकडून परंपरेचे जतन

चांदूर रेल्वे/19 ऑक्टोबर : नवरात्रोत्सवात देशभरातील देवींची भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जाते. मात्र, अश्विन महिन्यातील महाष्टमीपासून विजयादशमीपर्यंत मातंग समाजात श्रद्धेने जपली जाणारी ‘ईना माय’ या देवीची अनोखी परंपरा आजही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. हत्ती हे वाहन आणि सोबत बाळाचे स्वरूप असलेल्या या देवीची घरगुती स्थापना केली जाते. अडीच दिवस भाविकांच्या घरी विराजमान होणार्या ईना आई च्या पूजाविधीमागील इतिहास अद्याप पूर्णपणे उलगडलेला नाही. त्यामुळे या वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरेभोवती गूढतेचे वलय कायम आहे.
अश्विन महिन्यातील महाष्टमीला मातीच्या स्वरूपात ईना मातेची ची मूर्ती मातीपासून घडविली जाते. या देवीला ‘ईना माय’, ‘ईनामाता’ किंवा ‘विना देवी’ अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. त्यानंतर घरगुती स्वरूपात तिची स्थापना करून पूजा-अर्चा केली जाते. ही देवी अडीच दिवस भाविकांच्या घरी विराजमान असते. यावेळी पारंपारिक लोकगीते ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महिला मंडळी गायन करतात महाष्टमीला सुरू होणार्या या पूजापरंपरेची सांगता विजयादशमीच्या काळात होते.
समाजातील पारंपरिक श्रद्धेनुसार, हा देवीचा माहेरपणाचा काळ मानला जातो. हत्ती हे तिचे वाहन असल्यामुळे तिच्या स्वरूपाचा संबंध गजलक्ष्मीशीही जोडला जातो. गजलक्ष्मीचे स्वरूप समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे ईना माय ही मातृत्व, माया आणि भक्तांच्या रक्षणाचे प्रतीक असल्याची श्रद्धा आहे.
अनेक कुटुंबांची कुलदेवी; पिढ्यान्पिढ्यांची श्रद्धा
ईना मातेची ची पूजा अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवतेच्या स्वरूपात केली जाते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही अनेक कुटुंबांनी जपली आहे.
ग्रामीण भागातील बर्याच खेडेगावात ईना माय बसविल्या जाते अशातच बडनेरा येथील रहिवासी निवृत्त नायब तहसीलदार गजानन दादुजी खंडारे यांच्या कुटुंबात ईना मातेची स्थापना करण्याची परंपरा गेल्या 131 वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या कुटुंबाने आजवर ही परंपरा श्रद्धेने जपली असून, दरवर्षी त्यांच्या घरी ईना मातेची स्थापना केली जाते. बदलत्या काळातही आपल्या पूर्वजांकडून आलेली परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न लोकसंस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.
‘सोनं’ देऊन घेतले जाते देवीचे दर्शन
विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देऊन ‘सोनं’ वाटण्याची परंपरा सर्वत्र प्रचलित आहे. याच दिवशी ईना मातेच्या दर्शनासाठीही ग्रामीण भागातील नागरिक आवर्जून एकत्र येतात. देवीला लिंबू कापून अर्पण करून ’जगो रे सोनं’ असा जयघोष केल्या जातो. हे पूजाविधीचे वेगळेपण अधोरेखित करते.
भाविक ईना मातेला दसर्यानिमित्त ‘सोनं’ अर्पण करून तिचे दर्शन घेतात. देवीसमोर नतमस्तक होऊन आपल्या मनातील इच्छा-आकांक्षा व्यक्त करतात. सुख, समाधान, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या निमित्ताने गावातील नागरिक एकत्र येत परंपरेचे जतन करतात.
दही भात, लिंबू आणि गोडधोड नैवेद्याचा पाहुणचार
ईना मातेच्या पूजेदरम्यान दहीभात, लिंबू आणि विविध गोडधोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवीला माहेरवाशिणीप्रमाणे पाहुणचार देण्याची भावना या विधीमागे असल्याचे सांगितले जाते.
अडीच दिवसांचा पूजाकाल पूर्ण झाल्यानंतर विजयादशमीच्या रात्री देवीची मूर्ती गावालगत असलेल्या विशिष्ट शेतात नेऊन ठेवली जाते. विशेष म्हणजे, अनेक देवींच्या मूर्तींप्रमाणे ईना मातेचे विसर्जन नदी किंवा तलावाच्या पाण्यात केले जात नाही. मूर्ती शेतात ठेवून तिची परंपरेनुसार पूजा-अर्चा केली जाते. त्याच शेताला मग ईना मातेचे शेत म्हणुन गावगाड्यात ओळखले जाते.निसर्गाशी जोडलेली ही प्रथा ईनामाय च्या पूजापद्धतीचे वेगळेपण अधोरेखित करते.
जुन्या लोकगीतांत दडलेत इतिहासाचे धागे
ईना मायीच्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे देवीच्या पूजेदरम्यान गायली जाणारी पारंपरिक गाणी. समाजातील वयोवृद्ध महिला आजही ही गाणी गातात. या गीतांमधून देवीचा महिमा, तिच्याविषयीची श्रद्धा आणि परंपरेचे काही पैलू समोर येतात.





