5 वर्षात शंभरापेक्षा अधिक बालकांच्या तस्करीचे रॅकेट?
शिवसेना नेत्या वर्षा भोयर यांचा खळबळजनक आरोप

भोजने मॅटर्निटी रुग्णालयाचा धक्कादायक कारनामा
प्रकरणाची सेटलमेंट नाकारल्याने धमकीचे फोन
डॅा.वैशाली भोजनेचे पती शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख
पत्रकार परिषदेत रॅकेटची कसून चौकशी करण्याची मागणी
अमरावती/19 ऑक्टोबर– डॉ. वैशाली भोजने प्रसूती रुग्णालयात नवजात बालिकेच्या कथित विक्रीप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आ.ले आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या वर्षा भोयर आणि युवती जिल्हाप्रमुख कोमल बद्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, संबंधितांवर गुन्हा दाखल करणे आणि बाळासह आईच्या सुरक्षेची मागणी केली आहे. बालिकेसाठी 4.40 लाख रुपयांची बोली लावल्याचा दावा करण्यात आला असून, गेल्या 5 वर्षांत 100 ते 150 बालकांच्या कथित खरेदी-विक्रीच्या संशयाचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वर्षा भोयर यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्या दाव्यानुसार, 16 ऑक्टोबर 2026 रोजी एका अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर तिच्या नवजात
बालिकेला पैशांच्या बदल्यात देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आणि कोमल बद्रे यांनी संबंधित रुग्णालयात जाऊन माहिती गोळा केली. या प्रकरणाशी संबंधित ध्वनिमुद्रण, चित्रफीत आणि इतर पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. वैशाली भोजने यांच्याकडून कथितरीत्या साडेतीन ते 4 लाख रुपयांपर्यंतची मागणी झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची माहिती समोर आणल्यानंतर प्रफुल्ल भोजने यांनी तडजोडीसाठी पैशांची ऑफर दिली आणि नकार दिल्यावर धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला. प्रफुल्ल भोजने हे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुखअसल्याचे तक्रारकर्त्यांनी सांगितले. वर्षा भोयर यांच्या दाव्यानुसार, या कथित व्यवहारात काही डॉक्टर, मध्यस्थ आणि इतर व्यक्ती सहभागी असण्याची शक्यता आहे. मुलांच्या खरेदी-विक्रीचे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, 100 ते 150 बालकांच्या विक्रीसंबंधीच्या आकडेवारीची स्वतंत्र पुष्टी झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित बालिकेला सध्या बालकल्याण मंडळाकडे सोपवण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.





