टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात तिघांना अटक
दहा दिवसांची रेकी अन् 5 ते 6 राऊंड फायरींग

आरोपींमध्ये कोणीही अल्पवयीन नाही
मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई/19 ऑक्टोबर ; अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींपैकी कोणीही अल्पवयीन नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या हल्ल्यात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या कारवर 5 ते 6 राऊंड फायर केले होते.
रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टायगर श्रॉफ जुहू इथल्या एका फुटबॉल मैदानावर गेला होता. तिथून कारमधून बाहेर पडत असताना हा गोळीबार झाला. एकाच बाईकवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी टायगर श्रॉफ यांच्या कारवर 5 ते 6 वेळा गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते पसार झाले.
हल्लेखोरांनी गेल्या 10 दिवसांपासून टायगर श्रॉफच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. रविवारी ते जुहूच्या फुटबॉल मैदानावर जाणार याची त्यांना पूर्ण माहिती होती. पापाराझींचे व्हिडिओ किंवा सोशल मीडियावर त्यांनी टायगर दिवसभरात काय करतो
याचा अभ्यास केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. आरोपी आधी सुरत आणि नंतर गुजरात मार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. ते पुणे-जयपूर एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी राजस्थान आणि कोटा पोलिसांशी संपर्क साधला. कोटा रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमधून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सध्या त्यांना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
डीसीपी राज तिलक रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एक आरोपी 18 वर्षांचा आहे, तर इतर दोघे 22 वर्षांचे आहेत. यातील तिघेही अल्पवयीन नाहीत. त्यापैकी दोघे जण हरियाणामध्ये राहणारे आहेत, तर एक जण बिहारचा आहे. पकडलेल्यातीनही संशयितांकडून अद्याप कोणतेही शस्त्र हाती लागलेले नाही.
या गोळीबाराच्या घटनेपूर्वी टायगर श्रॉफला कोणत्याही प्रकारची धमकी मिळाल्याची माहिती पोलिसांकडे नाही. हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. कसून चौकशी केल्यानंतरच यामागील कारण समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.