शिक्षकांचे प्रश्न सोडवायला सरकार सक्षम – उपमुख्यमंत्री
किरण सरनाईक यांच्या पाठीशी भक्कम ताकद

मतपत्रिकेत एक नंबर नोंदवण्याचे आवाहन
अमरावती /18 ऑक्टोबर – अमरावती शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करावे, असे जाहीर आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जुनी निवृत्तीवेतन योजना, शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याबाबत सरकार पूर्णपणे अनुकूल असून सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि शिक्षकांच्या हक्कासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी या सभेत केला.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांशी थेट संवाद साधला. व्यासपीठावर महायुतीतील अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख नेते उपस्थित होते.
किरण सरनाईक यांनी आपल्या कार्यकाळात शाळांचा कायापालट करण्यासाठी मोठा निधी मिळवून दिला. त्यांनी सादर केलेला कार्यपूर्ती अहवाल त्यांच्या कामाची खरी पोचपावती देतो. मी मुख्यमंत्री पदावर असताना टप्पावाढीसाठी 1160 कोटी आणि त्यानंतर 970 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. शिक्षण क्षेत्रात काम करणार्या घटकांना न्याय देण्यासाठी महायुती सरकार सदैव तत्पर राहिले आहे. 20 वर्षे सेवा बजावणार्या जुन्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षेची अट शिथिल करण्याबाबत शासन सकारात्मक मार्ग काढणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांवर लादण्यात येणारी अशैक्षणिक कामे बंद करून केवळ शिकवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली पाहिजे, ही शिक्षकांची मागणी रास्त असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.
शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहून संकटाच्या काळात तातडीने मदत पोहोचवण्याचे काम आम्ही केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत थांबणार नसून ती अविरतपणे सुरूच राहणार आहे. विरोधी पक्षांनी केवळ सत्ता गमावल्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे उद्योग चालवले आहेत. महायुती सरकार कामावर विश्वास ठेवणारे असून दिलेला शब्द पाळणारे आहे. 23 तारखेला होणार्या मतदानात मतपत्रिकेवर तीन क्रमांकावर नाव असले तरी किरण सरनाईक यांच्या नावापुढे 1 हा पसंतीचा अंक नोंदवून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. 27 तारखेला मतमोजणीच्या दिवशी विजयाचा गुलाल उधळण्यासाठी स्वतः उपस्थित राहणार असल्याचा शब्द त्यांनी उपस्थितांना दिला.





