22 झोपडपट्ट्यांच्या अधिकृत घोषणेची मागणी

विकासकामांना गती देण्यासाठी भाजपचा पुढाकार, पालखी मार्गावरील पुलासाठी 25 लाखांची मागणी

अमरावती /15 ऑक्टोबर – शहरातील 22 झोपडपट्ट्यांची अधिकृत घोषणा करून रखडलेली विकासकामे मार्गी लावावीत, तसेच पालखी मार्गावरील हॉटेल हरियाली परिसरातील पुलासाठी विकास निधीतून 25 लाख रुपये तातडीने उपलब्ध करावेत, अशी मागणी भाजप नेते तुषार भारतीय यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये 30 ते 40 वर्षांपासून नागरिक राहत असूनही अधिकृत मान्यता नसल्याने रहिवाशांना पायाभूत सुविधा आणि पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी भारतीय यांनी केली.
तुषार भारतीय यांनी शहरातील सर्व 22 प्रभागांमधील झोपडपट्ट्यांची लोकसंख्येसह सविस्तर यादी आयुक्तांना सादर केली. झोपडपट्ट्यांना अधिकृत मान्यता नसल्याने विकासकामे रखडली असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. याबाबत आयुक्त डॉ. गोंदावले यांच्याशी चर्चा झाली असून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी प्रशासनाने दर्शविल्याचे भारतीय यांनी सांगितले. आरक्षण जाहीर नसलेल्या वस्त्यांबाबत राज्य शासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार, संबंधित नियमांच्या आधारे कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली. निंभोरा झोपडपट्टी 1990 पासून, तर वसंतराव नाईक झोपडपट्टी 2000 पासून वसलेली आहे. अमरावती मतदारसंघासह बडनेरा मतदारसंघातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पालखी मार्गावरील हॉटेल हरियाली परिसरातील पुलासाठी 65 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली असली, तरी 25 लाख रुपयांची कमतरता आहे. विकास शुल्कातून ही रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्तांनी मान्य केल्याचे भारतीय यांनी सांगितले. शहरातील उद्यानांच्या देखभालीतील त्रुटींवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. बारिपुरा येथील उद्यानावर 1 कोटी 75 लाख रुपये खर्च होऊनही स्थिती खराब असल्याने संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करून पैसे वसूल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, सभागृह नेते चेतन गावंडे आणि भावी महापौर आशीष अतकरे उपस्थित होते.

Back to top button