पाणीपुरवठा विभागाला दोन वर्षांपासून केंद्राचा निधी नाही
मंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा

मुंबई /14 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाच, राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की, त्यांच्या विभागाला सप्टेंबर 2024 पासून केंद्राकडून कोणताही निधी मिळालेला नाही. जर हा निधी मिळाला असता, तर परिस्थिती वेगळी असती, असे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, सध्या राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिक येथे 700 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आम्हाला अपेक्षेप्रमाणे सप्टेंबर 2024 पासून निधी मिळालेला नाही. राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून निधी दिला. जर आम्हाला तो निधी मिळाला असता, तर चित्रवेगळे असते. कंत्राटदार, ग्रामस्थ, शेतकरी आणि आमदार परिस्थितीसाठी आम्हाला दोष देतात.अनेक प्रकल्प असे आहेत जिथे 80-90 टक्के काम पूर्ण झाले आहे. जर आम्हाला निधी मिळाला, तर आम्ही डिसेंबरपर्यंत काही कामे पूर्ण करू शकतो आणि टँकर्सची संख्या कमी करता येईल. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील असल्याने ते या समस्येकडे लक्ष देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. येत्या काही महिन्यांतील परिस्थितीचा सामना करण्याच्या तयारीसाठी विभागवार आणि विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.





