गांज्याच्या शेतीवर पोलिसांचा छापा
5.712 किलो गांजासह 2.85 लाखांचा मुद्देमाल जप्त

काटकुंभमधील शेतकर्यास अटक
चिखलदरा /14 ऑक्टोबर– मेळघाटातील काटकुंभ गावात शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून 5 किलो 712 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत 2 लाख 85 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, देविदास ऊर्फ धनराज तुळशीराम सतवासे (वय 48, रा. आनंदनगर, काटकुंभ) याला अटक करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे मेळघाट परिसरात खळबळ उडाली आहे.
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहारांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 13 ऑक्टोबर रोजी काटकुंभ येथील एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने संबंधित शेतात जाऊन छापा टाकला. तपासणीदरम्यान गांजाची लागवड केल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी गांजा जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले.
शेतातच गांजाची लागवड करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न होता का, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, गांजाची लागवड कोणत्या उद्देशाने करण्यात आली, याचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणी चिखलदरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोडेवाड आणि धारणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर, पोलीस अंमलदार बळवंत दाभने, भूषण पेटे, गणेश आगोले, निलेश डांगोरे यांचा समावेश होता. चिखलदरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अंमलदार गजानन वर्मा, सतीश जामोदकर आणि चालक नईम यांनीही कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत.





