चिखलदरा तालुक्यात 850 बालके कुपोषणाच्या विळख्यात

दुर्गम भागातील अंगणवाड्यांची दुरवस्था; प्रशासनासमोर मोठे आव्हान

विस्तार अधिकार्‍याकडून धक्कादायक माहिती उघड

चिखलदरा /21 सप्टेंबर– मेळघाटची कुपोषणाची ओळख काही प्रमाणात बदलली असली तरी कुपोषणाचा प्रश्न अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. चिखलदरा तालुक्यातील 143 गावांमध्ये असलेल्या 229 अंगणवाडी केंद्रांमध्ये 7 महिने ते 6 वर्षे वयोगटातील 14 हजार 607 बालके पोषण आहार घेत आहेत. त्यापैकी 50 बालके अतितीव्र कुपोषित, तर 800 बालके मध्यम कुपोषित असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास विभागाचे विस्तार अधिकारी सारंग काडे यांनी आपली मातृभूमीशी बोलतांना दिली. पावसाळ्यात कुपोषणाची समस्या अधिक जाणवत असताना दुर्गम व अतिदुर्गम गावांतील अंगणवाड्यांची दुरवस्था, अपुर्‍या सुविधा, वाहतुकीच्या अडचणी आणि कर्मचार्‍यांवरील मोठी जबाबदारी यामुळे कुपोषणावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्याचे आव्हान कायम आहे.
चिखलदरा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये दररोज बालकांना लापशी आणि खिचडीचा पोषण आहार दिला जातो. बालकांचे वजन आणि उंची मोजून त्यांच्या वाढीचा आढावा घेतला जातो. त्यानुसार बालकांना अतितीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित आणि सामान्य अशा गटांमध्ये ठेवले जाते. कुपोषित बालकांना नियमित पोषण आहार देऊन त्यांचे वजन वाढविणे आणि त्यांना सामान्य गटात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, दुर्गम भागातील परिस्थितीमुळे या प्रयत्नांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील 229 अंगणवाडी केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी 9 महिला पर्यवेक्षक कार्यरत आहेत. एका पर्यवेक्षकाकडे सुमारे 25 अंगणवाडी केंद्रांची जबाबदारी असून, प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात सुमारे 15 गावांचा समावेश आहे. चिखलदरा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून अनेक गावे डोंगराळ आणि जंगल भागात आहेत. एका फेरीत सर्व गावांमध्ये पोहोचण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. खराब रस्ते, कच्चे मार्ग आणि वाहतुकीची अपुरी साधने यामुळे पर्यवेक्षकांना गावागावात पोहोचताना मोठी कसरत करावी लागते.दुर्गम गावांमध्ये जाण्यासाठी अनेकदा भाड्याच्या चारचाकी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. काही ठिकाणी बसने प्रवास करावा लागतो. मात्र, गावात पोहोचल्यानंतर राहण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने कर्मचार्‍यांसमोर आणखी एक अडचण उभी राहते. त्यामुळे नियमित भेटी, बालकांची तपासणी आणि अंगणवाडी केंद्रांची पाहणी यामध्ये अडथळे निर्माण होणे साहजिक आहे.चिखलदरा तालुक्यातील चुरणी, मोथा, गोलखेडा, खटकाली, सेमाडोह, सलोना, टेंभुरसोंडा, जरीदा आणि हातरू या भागांत अंगणवाडी केंद्रांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. प्रत्येक पर्यवेक्षकाकडे अनेक गावांची जबाबदारी असल्याने मर्यादित मनुष्यबळात प्रत्येक केंद्रावर नियमित लक्ष ठेवणे कठीण ठरत आहे. कुपोषणाची संख्या कमी करण्यासाठी केवळ पोषण आहार पुरविणे पुरेसे नसून बालकांचे नियमित वजन, आरोग्य तपासणी, मातांना मार्गदर्शन, स्वच्छता आणि अंगणवाडीतील मूलभूत सुविधा याकडेही तितकेच लक्ष देण्याची गरज आहे.(अनेक अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींची अवस्था खराब असल्याची स्थिती आहे. काही ठिकाणी लहानशा खोलीतच बालकांना बसविणे, त्याच ठिकाणी पोषण आहार तयार करणे आणि इतर कामे करावी लागतात. साधारण 10 बाय 10 फुटांच्या खोलीत बालकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देणेही अंगणवाडी सेविकांसाठी मोठे आव्हान ठरते. अशा परिस्थितीत बालकांची स्वच्छता, सुरक्षितता आणि पोषण आहाराची योग्य व्यवस्था राखणे कठीण जाते.मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाही. दुर्गम भागातील रस्ते, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, रोजगाराची परिस्थिती आणि कुटुंबांची आर्थिक स्थिती या अनेक बाबींचा बालकांच्या पोषणावर परिणाम होतो. त्यामुळे कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रांवरील यंत्रणा अधिक सक्षम करण्याबरोबरच दुर्गम गावांतील मूलभूत सुविधा सुधारण्याची गरज आहे.चिखलदरा तालुक्यातील 850 कुपोषित बालकांची आकडेवारी ही प्रशासनासाठी निश्चितच गांभीर्याने घेण्यासारखी आहे. त्यात 50 बालके अतितीव्र कुपोषित असल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. उर्वरित 800 मध्यम कुपोषित बालकांचेही नियमित निरीक्षण करून त्यांची वाढ सामान्य पातळीवर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहेत. अंगणवाडीपर्यंत पोषण आहार पोहोचतो आहे, मात्र त्या आहाराचा लाभ योग्य पद्धतीने आणि नियमितपणे बालकांपर्यंत पोहोचतो आहे का, याचीही प्रत्यक्ष पाहणी होणे गरजेचे आहे.

Back to top button