तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांचे आंदोलन

मृतदेहासह नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या

ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

नाशिक/13 सप्टेंबर: रस्ते अपघातामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या महिन्यात खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे जवळपास 6 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आता नाशिक पालिकेच्या चुकीमुळे दुचाकीवरून जाणार्‍या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पाऊस आणि अंधार असल्यामुळे रस्त्यावर टाकलेले काळे पाइप्स दिसले नाहीत आणि दुचाकी थेट काळ्या पाइप्सवर जाऊन धडकली. या अपघातात सिद्धार्थ गोरे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी आहे. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांसह नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आज (13 सप्टेंबर) सिद्धार्थ गोरेचा मृतदेह थेट नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नेत ठिय्या आंदोलन केले.
सिद्धार्थ गोरे याचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांसह नागरिक संतप्त झाले आहेत. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांसह नागरिकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तसेच मृत सिद्धार्थ गोरेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांसह नागरिकांनी त्याचा मृतदेह थेट नाशिक महापालिकेमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मुख्य गेटला कुलूप लावल्याने नातेवाईकांसह नागरिकांनी मृतदेह गेटबाहेर ठेवत प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले.

Back to top button