सह्याद्रीच्या कुशीत बच्चू कडूंचा साहसी थरार
300 फूट लिंग्या धबधब्यावर केले वॉटरफॉल रॅपलिंग

चादूरबाजार/12 सप्टेंबर : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी आता सह्याद्रीच्या कड्यांवरही आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखवली. पुणे जिल्ह्यातील लवासा परिसरापुढील लिंग्या घाटातील तब्बल 300 फूट उंच लिंग्या वॉटरफॉलवर बच्चू कडू यांनी वॉटरफॉल रॅपलिंगचा थरारक अनुभव घेतला. धबधब्याच्या फेसाळत्या प्रवाहातून दोरीच्या साहाय्याने उंच कड्यावरून खाली उतरण्याचे हे आव्हान अत्यंत रोमांचकारी होते. सुरक्षा साधने आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बच्चू कडू यांनी कोणतीही भीती न बाळगता संपूर्ण आत्मविश्वासाने हे आव्हान पूर्ण केले.वशेष म्हणजे, यापूर्वी बच्चू कडू यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला आहे. आता थेट एव्हरेस्टवर चढाई करण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून आपल्या रोजच्या राजकीय आणि सामाजिक धकाधकीतून वेळ काढत अशा साहसी उपक्रमांच्या माध्यमातून स्वतःची शारीरिक व मानसिक तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
आव्हान कितीही मोठं असो, मागे हटायचं नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करताना जसं धैर्य लागतं, तसंच एव्हरेस्ट चढतानाही जिद्द आणि आत्मविश्वास लागतो. सह्याद्रीतील हा अनुभव एव्हरेस्टच्या तयारीतील एक टप्पा आहे. लक्ष्य मोठं आहे आणि तयारीही त्याच ताकदीने सुरू आहे, अशी भावना बच्चू कडू यांनी व्यक्त केली.राजकीय संघर्षाच्या मैदानात आक्रमक भूमिका घेणारे बच्चू कडू साहसी उपक्रमांमध्येही आव्हान स्वीकारण्याची आपली वृत्ती कायम ठेवत असल्याचे या निमित्ताने दिसून आले. 300 फूट खोल दरीत रॅपलिंगचा हा थरार आणि त्यापूर्वीचा एव्हरेस्ट बेस कॅम्पचा अनुभव पाहता, आता त्यांच्या साहसी वाटचालीचे पुढचे लक्ष्य एव्हरेस्ट असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सह्याद्रीतील साहसी पर्यटनाला चालना देतानाच युवकांनी निसर्गाशी जोडले जावे, साहसाची जिद्द निर्माण करावी आणि कोणतेही आव्हान आत्मविश्वासाने स्वीकारावे, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. साहसी पर्यटन करताना प्रशिक्षित तज्ज्ञांचे मार्गदर्शन, योग्य सुरक्षा साधने आणि हवामानाची परिस्थिती यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्षाची वाट असो किंवा एव्हरेस्टची चढाई-आव्हान मोठं असेल तर ते स्वीकारायचं आणि शेवटपर्यंत लढायचं, हीच बच्चू कडूंची ओळख या साहसी उपक्रमातून पुन्हा एकदा ठळक झाली.





