चांदूर रेल्वे न. प. चा ढिसाळ कारभार, काँग्रेस आक्रमक
स्वच्छता, पाणी पूरवठ्याची समस्या गंभीर

-वीरेंद्र जगताप यांनी मुख्याधिकार्यांना धारेवर धरले
चांदुर रेल्वे / 27 जून : चांदुर रेल्वे शहरात नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पाणी पूरवठा, स्वच्छता, पथदिवे आदीबाबतीत नगर परिषद प्रशासन उदासिन असून त्याचा मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. याच मुद्यावरुन काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी आज नगर परिषदेवर धडक देवून याबाबत प्रशासनाला जाब विचारला. माजी आमदार व काँग्रेस नेते विरेंद्र जगताप यांनी मुख्याधिकारी आणि कर्मचार्यांना चांगलेच धारेवर धरले.
चांदूर रेल्वे नगरपरिषदेत 2021 मध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कालावधी संपल्यानंतर प्रशासनाचे राज्य असून मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी मनमानी कारभार चालविला असून त्यातून निर्माण झालेल्या विविध समस्यांचा शहरवासीयांना सामना करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी आज यासंदर्भाने मुख्याधिकार्यांची चांगलीच कान उघाडणी केली. यावेळी कर्मचारी सुट्टीचा अर्ज न टाकता गैरहजर आढळले. त्यावर काय कारवाई करणार अशी विचारणा मुख्याधिकार्यांना केली. शहरात पावसाळ्याच्या आधी नालेसफाई जात होती. मात्र गेल्या चार वर्षापासून त्या नाल्यांमधील कचरा नाल्याच्या काठावरच टाकून ढिगारे तयार झालेले आहे. हा नाला शहराच्या मध्यभागी आहे. पाउस आला की, हा कचरा रस्त्यावर पसरत असल्याने आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून ही समस्या गंभीर बनली आहे. या कचर्याची विल्हेवाट का लावली नाही, अशी विचारणा करुन जगताप यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.
अस्वच्छतेमुळे शहरात सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचर्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक अस्वस्थ आहे. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून सिमेंट रस्ते बांधलेले उघडून टाकले आहे. मात्र मातीचे ढिगारे सिमेंट रस्त्याच्या बाजूला पसरल्यामुळे अनेक अपघात झाले आहे. विद्यार्थी, नागरिकाना त्रास होत आहे. यासंदर्भात शहर काँग्रेस कमिटीने अनेक निवेदन नगरपरिषदला दिले परंतु प्रशासनाने कारवाई केली नाही. यावरुन जगताप यांनी जाब विचारुन प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी मुख्याधिकारी यांनी मंगळवारपर्यंत संपूर्ण माहिती घेऊन कामकाज सुरळित करण्याचे आणि शहरातील स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मंगळवार पर्यंत कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. यावेळी प्रा. प्रभाकर वाघ, शिट्टू सूर्यवंशी, देवानंद खुणे, अमोल होले, निवास सूर्यवंशी, हर्षल वाघ, सुमेध सरदार, महेश कलावटे, प्रफुल कोकाटे, बालू देशमुख, राजू लांजेवार, संदीप शेंडे, पंकज मेश्राम, शरद घासले, दिनेश वाघाडे, सक्षम वानखडे, रितेश शेळके, हाजी अनिस सौदागर, रुपेश पुडके, अनिल फरकाडे, शहेजाद सौदगर, दीपक अग्रवाल, अर्पित चौधरी, जाकीर भाई, रमेश गिरडकर, सतीश देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.




