‘कॅम्पस सोलरायझेशन’ आणि ‘ग्रीन स्किल्स’ विषयावर विशेष व्याख्यान

पी. आर. पोटे पाटील महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे

अमरावती/28 ऑगस्ट- स्थानिक पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्याल यातील विद्युत अभियांत्रिकी विभागात सोमवारी शाश्वत ऊर्जा आणि हरित कौशल्य या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेचे महत्त्व रुजवून त्यांना अक्षय ऊर्जा क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी शोधण्यासाठी आणि हरित तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. महाविद्यालयात आयोजित या विशेष सत्रात ईसीई इंडिया एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अमरावती येथील मनुष्यबळ, प्रशासन, कामकाज आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन विभागाचे महाव्यवस्थापक प्रवीणकुमार वानखडे हे मुख्य वक्त म्हणून लाभले होते. त्यांनी सौर ऊर्जा प्रणालीची अंमलबजावणी आणि अभियांत्रिकीच्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असणार्‍या हरित कौशल्यांचा विकास यावर सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षण आणि उद्योगातील कौशल्यांचा ताळमेळ साधत विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व व्यावसायिक क्षमतेला नवीन दिशा देणार्‍या या कार्यक्रमास संस्थेचे संचालक डॉ. पी. एम. खोडके, प्राचार्य डॉ. पी. एम. जावंधिया, विभागप्रमुख डॉ. हेमंत सा. कुलटे, डीन डॉ. संजय बी. वरकड आणि सहायक विभागप्रमुख डॉ. प्रीती आर. राणे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. सारंग व्ही. भोंडे आणि प्रा. स्मिता व्ही. काळमेघ यांनी आयोजनाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पोहोकर व अनुष्का पातूरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार चि. प्रथमेश आडे याने मानले.

संबंधित बातम्या

Back to top button