अंबा नाल्यात कचरा टाकणार्‍यांवर मनपा करणार कारवाई

दोन कचराबाजांना महापालिकेने दिला दंड

हॉस्पिटलचा धोकादायक मेडिकल कचरा टाकला तर गुन्हा होणार दाखल

महापौर तेजवानी थेट रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची पळापळ

अमरावती /30 ऑगस्ट– शहरातल्या नाल्यांमध्ये कचरा फेकून प्रदूषण करणार्‍या आणि साथीचे रोग पसरवणार्‍या बेशिस्त लोकांविरोधात अमरावती महापालिकेने आता चांगलाच बडगा उगारला आहे. राजकमल चौक ते राजापेठ दरम्यानच्या अंबा नाल्याची पाहणी करताना महापौर श्रीचंद तेजवानी यांनी प्रत्यक्ष जागेवरच दोन जणांवर दंडात्मक कारवाई केली. याच दरम्यान नगरसेविका लविना हर्षे यांच्या घराजवळील नाल्यात थेट हॉस्पिटल्सचा अतिधोकादायक जैव-वैद्यकीय कचरा फेकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. पावसाळ्यात नाल्यात कचरा टाकल्याने पाणी तुंबून शहरात पूर येण्याची आणि आजार पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्या शी खेळणार्‍या अशा निष्काळजी लोकांवर आणि संबंधित हॉस्पिटल्सवर अजिबात दया न दाखवता कठोर कारवाई करण्याचे खणखणीत निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी महापौर अचानक रस्त्यावर उतरल्याने कचरा टाकणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. अंबा नाल्याची बारकाईने पाहणी केल्यानंतर त्यांनी साफसफाईच्या कामाचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान नाल्यात टाकलेला मेडिकल कचरा पाहून महापौरांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी आरोग्य विभागाला तातडीने चौकशी करून संबंधित हॉस्पिटल्सचा शोध घेण्याचे आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. घराघरांत येणार्‍या घंटागाडीतच कचरा द्यावा, नाल्यात किंवा उघड्यावर कचरा टाकू नये असे आवाहन त्यांनी केले. कुणी कचरा टाकताना दिसल्यास त्याची माहिती आरोग्य निरीक्षकांना देण्याचे सांगण्यात आले. या पाहणीच्या वेळी नगरसेवक एडवोकेट प्रशांत देशपांडे, झोन क्रमांक 2 चे साहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर आणि आरोग्य निरीक्षक प्रशांत गावनेर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button