लोकवसाहती भागात पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यास कटिबद्ध
संमती कॉलनी व नवजीवन कॉलनी येथील विकास कामांचे आ.सुलभा खोडके यांच्या हस्ते भूमीपुजन

अमरावती /30 ऑगस्ट : अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील शेगाव-रहाटगाव प्रभागातील वाढत्या नागरी लोकवस्तीच्या भागात पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. याच अनुषंगाने संमती कॉलनी व नवजीवन कॉलनी परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन आ.सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. संमती कॉलनी येथे नाली बांधकाम व रस्ता बांधकाम, तसेच नवजीवन कॉलनी येथील रस्ता बांधकाम या कामांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी आमदार महोदयांनी विकास कामांचे स्थळी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली.
यावेळी बोलतांना आ.सुलभाताई खोडके म्हणाल्या की, अमरावती शहरातील वाढत्या नागरी लोकवसाहतींमध्ये नागरिकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता आहे. रस्ते, नाली, पाणी, स्वच्छता यांसह मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध असून विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी आपल्या प्रभागात निर्माण झालेल्या विकासात्मक सुविधांचा लाभ घेत असतांना त्या दीर्घकाळ टिकल्या पाहिजे, यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या प्रभागाचे सौंदर्य अबाधित राखण्यास सहकार्य अपेक्षित असल्याचे आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सांगितले. दरम्यान आमदार महोदयांनी स्थानिक भागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून आगामी काळात त्याची प्राधान्याने पूर्तता करण्याचा विश्वास देखील आमदार महोदयांनी व्यक्त केला. यावेळी मनपा शहर सुधार समिती सदस्य तथा नगरसेवक – प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, मनपा नगरसेवक – चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर, यांच्यासह संमती कॉलनी , नवजीवन कॉलनी, राज रेसिडेन्सी अपार्टमेंट आदी भागातील नागरिक तसेच शेगाव-रहाटगाव प्रभागवासी व सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.




