बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा तडकाफडकी राजीनामा
अध्यक्ष हाफिज उद्दीन अहमद यांच्याकडे कार्यभार

ढाका /24 जुलै -दक्षिण आशियातील शेजारील देश बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणारा राजकीय थरार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शुक्रवारी एका मोठ्या धक्कादायक आणि ऐतिहासिक घडामोडीमध्ये बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बांगलादेशातील प्रसिद्ध वृत्तसंस्था ‘प्रथम आलो’ आणि आंतर राष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्ता नुसार, संसदेचे अध्यक्ष हाफिज उद्दीन अहमद यांनी त्यांचा राजीनामा अधिकृतपणे स्वीकारला आहे. या राजी नाम्या मुळे बांगला देशच्या सत्ताकारणात आणि घटनात्मक चौकटीत पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 76 वर्षीय राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या संभाव्य राजीनाम्याबाबत ढाक्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अखेर गुरुवारी त्यांनी बंगभवन येथील वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची आपली मानसिक तयारी दर्शवली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या सहीचे पत्र अध्यक्षांकडे सुपूर्द केले. आपल्या राजीनामा पत्रात शहाबुद्दीन यांनी स्पष्ट केले आहे की, गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून ते विविध गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदार पदाची कर्तव्ये शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या पार पाडणे त्यांच्यासाठी अशक्य बनले होते




