अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त
50 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुटखा माफियांचे धाबे दणाणले

कारखान्याचा मालक गौरव शर्माविरोधात गुन्हा दाखल
अकोला/16 जुलै :अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्राचा कोपरा
आणि कोपरा खणून काढला आहे. भेसळयुक्त पदार्थांपासून ते औषधांच्या गैरव्यवहारापर्यंत अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली. अशातच आता एफडीए ने अकोल्यातील एका गुटख्याच्या अवैध कारखानावर छापा तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाला संबंधित कारखान्यात गुटखा बनवण्याचे काम चालू
असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एफडीए अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील
पथकाने एमआयडीसीमधील गुटखा कारखान्यावर धाड टाकली. एमआयडीसी पोलीस आणि एफडीएच्या संयुक्त धाडेत या कारखान्यात तब्बल 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारखान्याचा मालक गौरव शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव शर्मावर मकोका अंतर्गत कारवाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारवाई दरम्यान फक्त गुटखा नाही तर, पान मसाला, कच्चा माल आणि उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या अशा बेकायदेशीर उद्योगांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या धाडीनंतर
जिल्ह्यातील इतर अवैध गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणांनी तपास अधिक तीव्र केला आहे.




