मोर्शीतील परळ जातीच्या सापासह 39 पिल्लांचे यशस्वी रेस्क्यू
आपत्ती बचाव बहुउद्देशीय संस्था व कार्स संस्थेची संयुक्त मोहीम

मोर्शी /3 जुलै : मोर्शी शहरातील समर्थ कॉलनी येथे रूपेश उज्जैनकर यांच्या राहत्या घरी परळ जातीचा साप व त्याची तब्बल 39 पिल्ले आढळून आली. घरामध्ये एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने सापाची पिल्ले आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव बहुउद्देशीय संस्था व कार्स संस्था यांच्या सर्पमित्रांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पथकाने अत्यंत दक्षतेने व कौशल्याने आई सापासह सर्व 39 पिल्लांचे सुरक्षित रेस्क्यू केले.
रेस्क्यूनंतर साप व त्याची सर्व पिल्ले त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आली. या मोहिमेमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
रेस्क्यू मोहिमेत सहभागी सर्पमित्र प्रियांशु तायवाडे विवेक सावरकर शेषांद्री वयले श्रवण खुरपे तोफिक शेख कार्स संस्थेचे अभय धामेधर महेश बाबुले यांनी संयुक्तपणे ही रेस्क्यू मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. घरात किंवा परिसरात साप अथवा इतर वन्यप्राणी आढळल्यास घाबरू नका, त्यांना मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधा. सर्पमित्र हेल्पलाईन : 9284642289 जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव बहुउद्देशीय संस्था व कार्स संस्था नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून वन्यजीवांचे संरक्षण, सर्पमित्र सेवा व जनजागृतीचे कार्य सातत्याने करत आहेत. साप निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. त्यांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.




