तुरुंगातील लाचखोर अधिकार्‍याच्या बंद घरातून दोघांना अटक

पुरावे नष्ट करण्यासाठी पाठवल्याचा संशय

जळगाव /28 जून : शहरातील गणेश कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केलेल्या घरात घुसखोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अकोला येथील लाचलुचपत प्रकरणात अडकलेल्या सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घरात शिडी लावून प्रवेश करणार्‍या दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले.
लाचखोर अधिकार्‍याच्या बंद घरातून आवाज येत असल्याची माहिती शेजार्‍यांनी दिल्यानंतर एसीबी आणि जिल्हापेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या दोघांना पकडण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रसाद नारखेडे (रा. डांभुर्णी, ता. यावल) आणि प्रवीण महाजन (रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अकोल्यातली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अडकलेल्या आरोपी लोकसेवक किरण चौधरी याच्या सांगण्यावरून हा घरफोडीचा प्रयत्न झाला होता का?, घरातील रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू एसीबीच्या कारवाईपूर्वी हटविण्याचा कट होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button