बिजिंगमधील सर्वात उंच गगनचुंबी इमारतीला विमानाची धडक

नवी दिल्ली/26 जून-घटना समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी एका लहान विमानाने बीजिंगमधील गगनचुंबी इमारतीला थेट धडक दिली. या भीषण अपघातामुळे चिनी राजधानीत प्रचंड घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही धडक बीजिंगच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये असलेल्या 109 मजली प्रसिद्ध ’चायना झुन’ इमारतीला बसली.
खिडक्या फुटल्या अन् ढिगारा रस्त्यावर पडला-स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विमानाची धडक इतकी भीषण होती की, इमारतीच्या दोन मोठ्या खिडक्यांच्या काचा फुटून चक्काचूर झाल्या. विमानाचे अनेक तुकडे आणि ढिगारा खाली रस्त्यावर पडला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तात्काळ संपूर्ण टॉवर रिकामा केला असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन सेवा आणि मदत पथके तैनात केली आहेत. सोशल मीडियावर प्रत्यक्षदर्शींनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये इमारतीवरून ढिगारा खाली पडताना आणि टॉवरच्या खालच्या भागातून धूर निघताना दिसत आहे. प्राथमिक अहवालानुसार, या अपघातात विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
30 मिनिटांतच तुटला होता संपर्क-अपघातग्रस्त विमानाची ओळख ’इ-12झझ’ मॉडेल म्हणून झाली आहे. या विमानाने शिफोसी विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर अवघ्या 30 मिनिटांतच बीजिंगच्या ईस्ट फिफ्थ रिंग रोडजवळ या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला होता. त्यानंतर काही वेळातच हे विमान थेट ’चायना झुन’ टॉवरला धडकल्याची बातमी समोर आली.
1,700 फूट उंच टॉवरभोवती लष्कराचा वेढा-’सिटिक टॉवर’ म्हणून ओळखला जाणारा ’चायना झुन’ हा सुमारे 1,700 फूट उंच असून तो बीजिंगमधील सर्वात उंच टॉवर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशामक दल आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला किंवा किती जण जखमी झाले, याची अधिकृत आकडेवारी चिनी प्रशासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता की अन्य काही कारणांमुळे हा अपघात घडला, याचा तपास तपास यंत्रणा करत आहेत. इतक्या उंच इमारतीला विमान धडकण्याची ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

Back to top button