पोटनिवडणुकीवर आपची छाप, गुजराथमध्ये मारली बाजी

बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराचा दारुन पराभव

-आपचा 2 जागांवर विजय
-काँग्रेस, भाजप, तृणमूलला प्रत्येकी 1 जागा
नवी दिल्ली / 23 जून : गुजरातसह चार राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर झाले. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दोन जागांवर विजय मिळविला. तर भाजपा, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला प्रत्येकी एक जागा जिंकण्यात यश मिळालं. विशेष बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला. गुजरातमधील विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत ‘आप’च्या उमेदवाराने भाजपा उमेदवाराचा तब्बल 17 हजार मताधिक्याने पराभव केला.
पश्चिम बंगालमधील कालीगंज, पंजाबमधील लुधियाना पश्चिम, गुजरातमधील विसावदर आणि केरळमधील निलांबूर या पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (तारीख 19 जून) मतदान घेण्यात आलं होतं. त्यानंतर आज, सोमवारी या पाचही जागांवरील मतमोजणी पार पडली. भाजपाने या पोटनिवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावून दिली होती. दुसरीकडे दिल्लीमधील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनेही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही पोटनिवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी आक्रमकपणे प्रचार केला होता.
राजधानी दिल्लीवर सलग 10 वर्ष सत्ता गाजविल्यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राजधानीतील सत्तेतून दूर व्हावं लागलं. त्यानंतर, गुजरात आणि पंजाबमधील पोटनिवडणुकीत आपला मोठं यश मिळालं आहे. गुजरातमधील विसावदर आणि पंजाबमधील लुधियाना मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे. विसावदरमध्ये आपचे उमेदवार गोपाल इटालिया तब्बल 17 हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांनी जवळपास 12 हजार मताधिक्यांनी विजय मिळविला आहे.
गुजरातच्या विसावदर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार किरीट पटेल पराभूत झाले आहेत. पश्चिम बंगालमधील कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार आशिष घोष पराभूत झाले आहेत. या जागेवर तृणमूलने 49 हजार मतांनी विजय मिळविला आहे. पंजाबच्या लुधियाना मतदारसंघात भाजपा उमेदवार जीवन गुप्ता यांचा दारुण पराभव झाला आहे, या जागेवर आम आदमी पार्टीचे संजीव अरोरा विजयी झाले आहेत. केरळमधील निलांबूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार मोहन जॉर्ज यांचा पराभव झाला. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आर्यदान शौकत यांचा विजय झाला. गुजरातमधील कडी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राजेंद्रकुमार चावडा विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रमेशभाई चावडा यांना पराभूत केलंय. पंजाबच्या लुधियाना विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचा विजय झाला.
-भाजपासाठी धोक्याची घंटा?
चार राज्यांच्या पाच विधानसभा पोटनिवडणुकीत चार जागांवर पराभव झाल्यामुळे भाजपासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. आगामी काळात बिहार, पश्चिम बंगाल, केरळ व गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. मात्र, त्याआधी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यामुळे विरोधीपक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे, तर भाजपाचे नेते मात्र चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये आपच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पंजाबमधील जनता ‘आप’ सरकारच्या कामावर खूप खूश आहे. तर गुजरातमधील जनता आता भाजपाला कंटाळली आहे. त्यांना आम आदमी पक्षाकडून प्रचंड अपेक्षा आहे, आगामी विधानसभा निवडणुकीत जनता आम आदमी पार्टीलाच पाठिंबा देईल, असा विश्वास केजरीवालांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button