अमरावतीच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस संभ्रमात

पक्ष तटस्थ की मतदान, निर्णय प्रलंबित

मतदानाच्या पूर्व रात्रीतही बैठकांचे सत्र सुरूच

अमरावती /17 जून- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी 18 जून रोजी मतदान होणार आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षाचा अधिकृत उमेदवार आजारी असल्याने रिंगणातून बाहेर पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते नेमकी काय भूमिका घेणार, दुसर्‍या कोणाला पाठिंबा द्यायचा की तटस्थ राहायचे, याचा पेच कायम आहे. या संभ्रमावस्थेमुळे काँग्रेस पक्षात दिवसभर खलबते सुरू होती, पण रात्री उशिरापर्यंत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने हर्षजीत देशमुख यांना अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर देशमुख अचानक आजारी पडून रुग्णालयात दाखल झाल्याने ते प्रचारातून पूर्णपणे गायब झाले आहेत. एका अर्थाने त्यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हर्षजीत देशमुख यांची माघार आणि सद्यस्थितीमुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांत स्थानिक काँग्रेस भवनमध्ये सात ते आठ वेळा बैठका झाल्या. काल रात्री जिल्हाभरातील पदाधिकार्‍यांची, तर आज सकाळी अमरावती महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत खा. बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अ‍ॅड. यशोमती ठाकूर, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते व माजी महापौर विलास इंगोले, शहराध्यक्ष व नगरसेवक बबलू शेखावत, स्वीकृत नगरसेवक व माजी महापौर मिलिंद चिमोटे, स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा द्यायचा की तटस्थ राहायचे, यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व चर्चांचा अहवाल प्रदेश नेतृत्वाकडे पाठवून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धण सपकळ यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्याचे ठरले असले, तरी अंतिम निर्णय प्रलंबित आहे. मतदान करण्याबाबत काँग्रेसची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button