बारा तासांत दोघांची धारदार शस्त्राने हत्या
पोलिसांनी दोन आरोपींसह एका विधीसंघर्ष बालकाला केली अटक

अकोला जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला
अकोला/14 जून- जिल्ह्यात अवघ्या 12 तासांच्या आत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अंगाचा थरकाप उडवणार्या खुनाच्या घटनांमुळे संपूर्ण भागात खळबळ उडाली असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घरगुती भांडण मिटवण्याच्या बहाण्याने एका 29 वर्षीय तरुणाचा काटा काढण्यात आला, तर पातूर तालुक्यातील आलेगाव येथे देखील जुन्या कौटुंबिक वादातून एका 17 वर्षीय मुलाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून मुख्य संशयितांना जेरबंद केले आहे.
रात्रीच्या वेळी तारफाईल भागात अंकित नंदा गवळी या तरुणाला घरगुती वाद मिटवू असे सांगून संशयित आनंद चवरे आणि त्याच्या साथीदारांनी बोलावून घेतले. त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या टोळक्याने अचानक धारदार शस्त्राने अंकितवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकितचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन लेव्हलकर यांच्यासह रामदास पेठचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी सहकार्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी अकोला शहर, रेल्वे स्थानक, बस स्थानक तसेच शेगाव येथील बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि भक्तनिवास परिसर पिंजून काढला. रात्रभर चाललेल्या या शोध मोहिमेत मुख्य संशयित निलेश ऊर्फ दत्तू बोरकर रा. तारफाईल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यातील इतर फरार साथीदारांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कसून शोध घेत आहे. दुसरी धक्कादायक घटना पातूर तालुक्यातील आलेगाव येथील वसंतराव नाईक शाळेसमोरील शेकापूर फाटा येथे उघडकीस आली. आलेगाव येथील रहिवासी असलेला यश गजानन गिर्हे हा मुलगा काही कामा निमित्त बाहेर पडला असता, गावातीलच काही तरुणांनी जुन्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरून त्याला रस्त्यात गाठले. संशयितांनी त्याच्यावर चाकूने सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले, ज्यात त्याचा करुण अंत झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख नितीन लेव्हरकर यांचे पथक, उपविभागीय पोलीस अधिकार्यांचे पथक आणि पोलीस ठाण्याचे पथक अशा तीन वेगवेगळ्या तुकड्या संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्या. गाव सोडण्याच्या तयारीत असलेले संशयित चैतन्य जगदीश काळपांडे आणि एक विधीसंघर्ष बालक दोन्ही रा. आलेगाव तालुका पातूर यांना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने दर्यापूर रस्त्यावरील आपातापा भागातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. ही संपूर्ण यशस्वी कामगिरी अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी चोख बजावली.
पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी-जिल्ह्यात अवघ्या काही तासांत दोन कोवळ्या जीवांचा बळी गेल्याने ग्रामीण आणि शहरी भागात भीतीचे वातावरण आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट खुनात होत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा गुन्हेगारांवर पोलिसांनी वचक ठेवावा आणि रात्रीची गस्त अधिक कडक करावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.




