हर्षदीप देशमुखांकडून काँग्रेस नेत्यांविरूद्ध मोठे षडयंत्र
नेत्यांच्या बदनामीचा डाव उघडकीस; नवख्या उमेदवारावर विश्वास ठेवणं काँग्रेस नेत्यांना भोवलं

अमरावती/14 जून– अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांच्या बाबतीत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये गैरसमज निर्माण करून, मतदार आणि जनतेत काँग्रेस नेतृत्वाबद्दल संभ्रम पसरविण्याचा डाव खुद्द हर्षदीप देशमुखांनीच आखल्याचे आता उघड झाले आहे.
विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा चालू असतानाच, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असावा? याची चाचपणी सुरू होती. काही इच्छुक उमेदवार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. इच्छुकांनी पक्षाच्या नेत्यांना भेटणे हा प्रक्रियेचाच एक भाग असतो. यादरम्यान हर्षदीप देशमुख यांनी माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील देशमुख यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, काँग्रेस पक्षाची उमेदवारी आपल्यालाच द्या, अशी थेट गळ त्यांनी घातली. मात्र, डॉ. सुनील देशमुख यांनी हर्षदीप देशमुखांना स्पष्ट सांगितले की, पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय हा सामूहिकपणे होत असल्याने आपण ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री श्रीमती यशोमतीताई ठाकूर व इतर सर्व नेत्यांची भेट घ्यावी. डॉ. देशमुखांच्या या रोखठोक भूमिकेनंतर हर्षदीप यांनी यशोमतीताईंकडे आपला मोर्चा वळविला. तिथेही त्यांना सांगण्यात आले की, उमेदवारी देण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील, त्यामुळे आपण त्यांना भेटावे. श्रीमती यशोमती ठाकूर यांच्या सुस्पष्ट भूमिकेनंतर हर्षदीप देशमुखांनी स्थानिक नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. काँग्रेस नेते बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप व अन्य नेत्यांना हर्षदीप भेटले. तसेच, जिल्ह्याचे खा. बळवंतराव वानखडे यांचीही त्यांनी भेट घेतली.
स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या या भेटसत्रानंतर हर्षदीप देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. एका सूत्राने दिलेल्या विश्वसनीय माहितीनुसार, हर्षवर्धन सपकाळ यांनी हर्षदीप देशमुख यांची निवड पक्की केली व त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना निवडणूक अर्जासोबत जोडावे लागणारे ’ए’ आणि ’बी’ फॉर्मही देण्यात आले. हर्षदीप देशमुखांनी उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणूक प्रक्रिया पुढे सरकली.इतर पक्षांच्या उमेदवारांचा निवडणूक प्रचार जोरात चालू असताना काँग्रेसचे उमेदवार कुठेच दिसत नाहीत, याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली. त्यानंतर अचानक नागपूरच्या एका रुग्णालयातून इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींशी हर्षदीप देशमुखांनी संवाद साधला. वृत्तवाहिन्यांनी हर्षजीत रूग्णालयात दाखल झाल्याची ब्रेकिंग न्यूज प्रसारित करताच अमरावतीच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. हर्षदीप देशमुख निवडणुकीचे मैदान सोडून दवाखान्यात भरती होण्यासारखं त्यांना झालं काय? आणि मग आयसीयूतून पत्रकारांना मुलाखती कशा देऊ शकतात? यावर काँग्रेस नेत्यांच्या तीव्र शब्दांत प्रतिक्रिया आल्या. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. दरम्यान, हर्षदीप यांना अमरावतीत आणले कोणी? याचा शोध घेणे काही संबंधितांनी सुरू केले. हर्षदीप देशमुख यांचा अमरावतीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बबलू देशमुख आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रवेश घडवून आणला, अशा प्रकारची चर्चा पसरविण्यात आली. वास्तविक पाहता बबलू देशमुख किंवा वीरेंद्र जगताप यांचा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नव्हता. केवळ त्यांच्या नावाचा गैरवापर करून राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजवून देण्यात आली. हर्षदीप देशमुख यांचा अमरावतीच्या राजकारणात झालेला प्रवेश, काँग्रेस नेत्यांशी संपर्क, भेटीगाठी व प्रदेशाध्यक्षांकडून थेट उमेदवारी मिळविणे हा एक पूर्वनियोजित प्लॅन होता. सामान्यतः कोणत्याही इच्छुक उमेदवाराने अशाच पद्धतीने वाटचाल केली असती. मात्र, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर हर्षदीप देशमुखांचा प्रचारातून काढता पाय आणि थेट रुग्णालयात दाखल होणे, हा ’प्लॅन बी’ समजला जात आहे.रूग्णालयात असतांना प्रारंभी हर्षजीत यांनी ऊन लागले,नंतर दगदगीचा थकवा व नंतर थेट एन्जिओप्लास्टी झाल्याचा बहाना केला.ताज्या बातमीनुसार त्यांनी मुतखडा झाल्याचे सांगितले जात आहे,ही सुद्धा अफवा असू शकते.रुग्णालयातून पत्रकारांना मुलाखती देऊन अमरावती जिल्ह्यात व संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाची जास्तीत जास्त बदनामी कशी होईल, यासाठी अत्यंत संवेदनशील वेळ निवडून अचूक टायमिंग साधणे, हा सगळा एका मोठ्या कटाचा भाग होता. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये गैरसमज होऊन पक्ष कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होईल अशी परिस्थिती तयार करणे, हा या षडयंत्राचा मुख्य उद्देश होता. आपल्या पक्षाकडे उमेदवारी मागायला आलेली व्यक्ती बिगरराजकीय असल्याने कोणी त्यांचा फारसा गांभीर्याने विचार केला नसावा. त्याचाच गैरफायदा घेऊन स्थानिक काँग्रेसच्या जबाबदार नेत्यांची जनतेतील प्रतिमा मलिन करण्याची योजना कोणाच्याच लक्षात आली नाही. हर्षदीप देशमुख रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांमधील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर आला. याच गोष्टींचा फायदा हर्षदीप देशमुखांनी एखाद्या मुरलेल्या कपटी राजकारण्यासारखा घेतला आणि ’नेते विरुद्ध नेते’ असा आभास तयार केला. हर्षदीप देशमुखांनी अत्यंत शांतपणे आखलेल्या या प्लॅनचा आता पर्दाफाश झाला आहे. काँग्रेस नेत्यांना त्यांच्याविरोधात इतका मोठा कट शिजत असताना गाफील राहण्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली, याची खंत मात्र आता सर्वांनाच बोचत आहे.




