वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक

गार्डसह 4 प्रवासी जखमी, प्रवाशांमध्ये खळबळ

वर्धा/7 जून -वर्ध्यातून मोठी बातमी हाती आली आहे. वर्ध्याच्या सिंदी रेल्वे स्थानकाजवळ दक्षिण सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. मानसिक रुग्णाने ट्रेनवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रेन दिल्लीकडे जाताना ही घटना घडली. या दगडफेकीत गार्डसह 3 ते 4 प्रवासी जखमी झाले. या घटनेने रेल्वेच्या डब्यात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडून दिल्लीकडे जाणारी दक्षिण सुपरफास्ट एक्स्प्रेस सिंदी स्थानकाजवळूनजात असताना संबंधित व्यक्तीने अचानक ट्रेनवर दगडफेक सुरू केली. यामुळे डब्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवासी व रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये घबराट पसरली असून अनेकांनी मदतीसाठी आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरपीएफचे प्रभारी सी. एल. कनौजिया यांनी सांगितले की, संबंधित मानसिक रुग्णाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने घटनेची सविस्तर चौकशी सुरू केली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रभावित प्रवाशांना पुढील प्रवासासाठी आवश्यक मदत व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button