राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अमृता अमझरेला सुवर्ण तर कुणाल अठोरला रौप्यपदक

अमरावती /4 जून-  ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे 24 ते 29 मे 2026 दरम्यान आयोजित 31 व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, भातकुलीची विद्यार्थिनी अमृता अमझरेे हिने महाराष्ट्र मुलींच्या संघाकडून खेळताना सुवर्णपदक पटकावले, तर चंद्रभानजी विद्यालय, कुंड सर्जापूरचा विद्यार्थी कुणाल अठोर याने महाराष्ट्र मुलांच्या संघाचे प्रतिनिधित्व करत रौप्यपदक मिळविले आहे.
मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघावर शानदार विजय मिळवत सुवर्णपदक पटकावीले. तर मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा सामना छत्तीसगड संघाशी झाला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाला पराभव स्विकारावा लागला आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अमरावती जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. विशेष म्हणजे हे दोन्ही विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या यशाबद्दल महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखनकर, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष इंद्रजीत नितनवार, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. प्रल्हाद राऊत, चंद्रभानजी विद्यालय कुंड सर्जापूरचे क्रीडा शिक्षक डॉ.शरद गढीकर आणि बेसबॉल प्रशिक्षक अकलिम शहा, साक्षात ढेंगेकर आणि विकी सैरिसे यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. अमृता अमझरेच्या सुवर्णपदकाने आणि कुणाल अठोरच्या रौप्यपदकाने अमरावती जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला असून युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button