दिल्लीत 6 मजली हॉटेलला आग, 21 मृत्यू
बांगलादेश-आफ्रिकन देशांचे 17 नागरिक

नवी दिल्ली/3 जून-दिल्लीच्या मालवीय नगर भागातील ’फ्लोरीश स्टे हॉटेल’मध्ये बुधवारी लागलेल्या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 17 परदेशी नागरिकांचा समावेश असून, ते बांगलादेश आणि विविध आफ्रिकन देशांतील रहिवासी होते.
दिल्ली अग्निशमन दल आणि स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवीय नगर येथील या हॉटेलमध्ये असलेल्या उपहारगृहात (रेस्टॉरंटमध्ये) सकाळी 8:50 वाजता आगीचा भडका उडाला. त्यानंतर ही आग इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील खोल्यांमध्ये तसेच तळघरातही (बेसमेटमध्ये) वेगाने पसरली. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून, त्यामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीच्या तिसर्या आणि चौथ्या मजल्यावरून अनेक लोक आपला जीव वाचवण्यासाठी हताश होऊन खाली उड्या मारताना दिसत आहेत. खाली पडताना होणारा आघात कमी करण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी जमिनीवर गाद्याही अंथरल्या होत्या. तळघरातूनही सहाहून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. एकूण 40 लोकांची सुटका करण्यात आली असली, तरी त्यातील अनेकांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत, दिल्लीच्या विविध भागांत आगीशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 66 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आग 6 मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बी-एन-बी रेस्तराँमध्ये लागली. थोड्या वेळाने ती हॉटेलमध्ये वरच्या दिशेने पसरली. हे हॉटेल दिल्लीतील प्रेस एन्क्लेव्ह रोडवर आहे. येथेच मॅक्स हॉस्पिटल आणि एम्स देखील आहे. असे सांगितले जात आहे की या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी येणार्या रुग्णांचे नातेवाईकही या हॉटेलमध्ये थांबत असत. हॉटेलला 6 खोल्यांची परवानगी होती, पण 25 खोल्या होत्या-फ्लरिस स्टे गेस्टहाऊसला बेड अँड ब्रेकफास्ट संकल्पनेअंतर्गत परवाना जारी करण्यात आला होता. या अंतर्गत 6 खोल्यांची परवानगी होती, परंतु 25 खोल्या बांधल्या होत्या. आग लागल्यानंतर हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या तळघरातही अनेक लोक अडकले होते. आत जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता, जो खूप अरुंद होता. हॉटेलकडे फायर छजउ नव्हती. येण्या-जाण्याचा एकच मार्ग होता.




