घाबरून जाऊन पेट्रोल डिझेलचा साठा करु नका-मुख्यमंत्री फडणवीस

पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास समस्या निर्माण होईल

मुंबई/20 मे- मी लोकांना विनंती करतो की, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली पुरवठा साखळी चांगली ठेवली आहे. पण, आपण जर घाबरून पेट्रोल-डिझेल खरेदी केली तर पुरवठा साखळी नीट राहू शकणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातून येत असलेल्या पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या घटनांवर सविस्तर भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, वारंवार केंद्र सरकारने सांगितले आहे की, पेट्रोल-डिझेलचा स्ट्रेटजिक साठा आमच्याकडे आहे. त्याचा पुरवठादेखील योग्य प्रमाणात होत आहे. पण, विनाकारण भीती तयार होतेय. लोकांमध्ये पॅनिक तयार झाल्यानंतर आपली पुरवठा साखळी कशी असते, तर वर्षानुवर्षे चालत असलेली असते. त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा एखाद्या तालुक्यात वर्षानुवर्षे महिन्याला किती पेट्रोल लागते. दिवसाला किती पेट्रोल लागते, या आधारावर पुरवठा साखळी तयार झालेली असते. पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मग अचानक जेव्हा अफवांवर आधारित लोक जास्त पेट्रोल भरणे सुरू करतात, तेव्हा ती पुरवठा साखळी विस्कळीत होते. याचा अर्थ साठा कमी आहे असे नाहीये. पण, अशा प्रकारच्या भीतीमुळे … उदाहरण म्हणून लोकांनी एकाच दिवशी पैसे काढणे सुरू केले तर ती बँक पैसे देऊ शकत नाही कारण त्यांचे पैसे गुंतवलेले असतात. तशीच परिस्थिती आहे. मी लोकांना विनंती करतो की, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली पुरवठा साखळी चांगली ठेवली आहे. पण, आपण जर घाबरून पेट्रोल-डिझेल खरेदी केली तर पुरवठा साखळी नीट राहू शकणार नाही. त्यात व्यत्यय येईल. त्यामुळे सगळ्यांनी पेट्रोल काळजीपूर्वक वापरावं आणि पुरवठा साखळी विस्कळीत करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात एक महिन्याचा साठा असल्याची माहिती दिली. पेट्रोल-डिझेलचा प्रश्न हा जागतिक आहे, हा प्रश्न मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्राचा नाही. अमेरिका- इराण यांच्या युद्धामुळे संपूर्ण जगाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button