उड्डाणपुलावरुन दोन युवक थेट खाली कोसळले

घटनेनंतर पुलावर नागरिकांची मोठी गर्दी

पंचवटी फ्लायओव्हरवर भरधाव दुचाकी आदळली

अमरावती/20 मे- शहरातील पंचवटी चौकाजवळील उड्डाणपुलावर बुधवारी दुपारी भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोन युवक थेट पुलाखालच्या रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात आकाश भगवान धांडेकर व आदर्श प्रफुल्ल चौधरी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव वेगातील दुचाकी कठड्यावर आदळल्यानंतर दोघे हवेत फेकले गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर पुलावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही युवक दुचाकीवरून पंचवटी उड्डाणपुलावरून जात होते. यावेळी दुचाकीचा ताबा सुटल्याने वाहन पुलाच्या कठड्यावर जोरात आदळले. धडक इतकी भीषण होती की दोघेही थेट पुलाखाली कोसळले. अपघात पाहणार्‍या नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. काही नागरिकांनी पोलिस व रुग्णवाहिकेला माहिती दिल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक पाहणीत भरधाव वेग व दुचाकीवरील नियंत्रण सुटणे हे अपघातामागील मुख्य कारण मानले जात आहे. परिसरातील दृकश्राव्य चित्रफितींची तपासणी सुरू असून पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान पंचवटी उड्डाणपुलावर वारंवार घडणार्‍या अपघातांमुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुलावर वेगनियंत्रक उभारावेत, मजबूत संरक्षक कठडे बसवावेत व नियमित पोलिस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मार्गावर भरधाव वाहनांचा धोका दिवसेंदिवस वाढत असून मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे.

उड्डाणपुलावरील बेफाम वेग ठरतोय जीवघेणा

पंचवटी उड्डाणपुलावर भरधाव वाहनांमुळे सातत्याने अपघात घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुलावर वेगनियंत्रक नसल्याने वाहनचालक बेदरकारपणे वाहन चालवत आहेत. तातडीने सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.यापुर्वीही दुचाकी स्वार उड्डाणपुलावरुन कोसळल्याच्या घटना घडल्या आहे. उड्डाणपुलावर चढताना वेग प्रतीबंधक व्यवस्था असणे आता गरजेचे वाटू लागले असून काही वळणावर लोखंडी कठडे बांधावे अशी नागरिकांची मागणी आहे.

संबंधित बातम्या

Back to top button