जिल्हाधिकार्‍यांकडून संत्रा बागेतील आधुनिक एआय तंत्रज्ञानाची पाहणी

अमरावती/15 मे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आधुनिक संत्रा बाग व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मोर्शी तालुक्यातील एआय आधारित संत्रा प्रात्यक्षिक प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.त्यांनी सिट्रस इस्टेट उमरखेड अंतर्गत या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची माहिती त्यांनी जाणून घेतली. मोर्शी येथील प्रगतशील शेतकरी नवीन पेठे यांच्या शेतावर हा प्रयोग राबविला जात आहे.
यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी खालील तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती घेतली. या प्रकल्पात एआय आणि आयओटी सेन्सर्सच्या मदतीने पिकांची रिअल-टाइम माहिती मिळवणे, उपग्रहाद्वारे पिकाच्या वाढीवर आणि ताणावर लक्ष ठेवणे, मातीतील ओलावा, खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन आणि रोग-कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शनाचा समावेश आहे. सिट्रस इस्टेटचे अध्यक्ष तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते आणि ’मॅप माय क्रॉप’ कंपनीच्या ऍग्रोनॉमिस्टनी सॅटेलाईट डेटाचा वापर दैनंदिन शेतीकामात कसा होऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक दिले. यामुळे शेतकर्‍यांना योग्य वेळी अचूक निर्णय घेणे सुलभ होणार आहे.बदलत्या हवामानात तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केले. आयओटी सेन्सर्समुळे खते आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन खर्च कमी होईल आणि संत्र्याचा दर्जा सुधारेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय तळेगावकर, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदिप पवार, तहसीलदार सागर ढवळे, तालुका कृषि अधिकारी प्रथमेश माने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button