परतवाड्याच्या नववधूसह दोघींचा भीषण अपघातात मृत्यू
लग्नाच्या उंबरठ्यावर काळाचा घाला

विवाह सोहळ्याची अक्षता पडण्यापूर्वीच होत्याचे नव्हते झाले
परतवाडा/29 एप्रिल– ज्या घराच्या अंगणात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते आणि जिथे लग्नाचा मांडव सजणार होता, त्याच घरासमोर आज मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. अवघ्या काही दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना नियतीने असा काही क्रूर डाव साधला की, लग्नाची नवरी असलेल्या देवमाळीच्या शिखाचा रस्ते अपघातात भीषण मृत्यू झाला.
आनंदाने बहरलेल्या घरात आता केवळ रक्ताचे सडे आणि काळजाचा थरकाप उडवणारे हुंदके उरले असून, या काळाच्या घालाने संपूर्ण परतवाडा परिसर सुन्न झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवमाळी येथील काशिकर कॉलनीतील रहिवासी शिखा विनायक बेलसरे हिचा विवाह येत्या 8 मे रोजी निश्चित झाला होता. लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात असताना, कुलदेवी सप्तशृंगी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि लग्नाचे पहिले निमंत्रण देण्यासाठी शिखा ही नातेवाईक सुनील मानकर, मीना मानकर (दोन्ही रा. हरम) आणि शुभम बेलसरे (रा. देवमाळी) यांच्यासह नाशिकच्या सप्तशृंगी गडावर गेली होती. देवीचे दर्शन घेऊन घराकडे परतत असताना जळगाव जिल्ह्यातील भांबरुड महादेवाजवळ काळाने आपला विळखा घातला. चालत्या वाहनाचा टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन लोखंडी गोळ्यासारखे रस्त्यावर आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, नवरी मुलगी शिखा विनायक बेलसरे आणि मीना मानकर या दोघींचा जागीच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. घरात लग्नाची लगबग आणि पाहुण्यांची वर्दळ असताना ही बातमी परतवाड्यात येऊन धडकली आणि एकच खळबळ उडाली. नियतीच्या या क्रूर खेळाने बेलसरे आणि मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या हातावर लग्नाची मेहंदी लागणार होती, ते हात कायमचे थंड पडले असून नवरीच्या या दुर्दैवी निरोपाने देवमाळी व हरम परिसरात शोककळा पसरली आहे. लग्नाच्या उंबरठ्यावर रक्ताचा सडा पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या असून, या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत्यूचा महामार्गावर थरार
लग्नाची पत्रिका देऊन आनंदाने घरी परतणार्या कुटुंबाला रस्त्यातच मृत्यूने गाठले. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि घराची लाडकी लेक काळाच्या पडद्याआड गेली. नियती इतकी कठोर असू शकते, याचा प्रत्यय या भीषण अपघाताने दिला असून या घटनेमुळे संपूर्ण शहराच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटून आला आहे. संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.




