जगातील पहिला लॅटिनमधील संस्कृत व्याकरण ग्रंथ मोदींना भेट
क्रोएशियाकडून खास गिफ्ट

झाग्रेब / 19 जून: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक क्रोएशिया दौर्यादरम्यान, क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रे प्लेंकोविच यांनी एक अत्यंत खास आणि सांस्कृतिक महत्त्व असलेली भेट दिली. त्यांनी पंतप्रधान मोदींना क्रोएशियन वैज्ञानिक आणि मिशनरी फिलिप वेझ्डिन यांनी लिहिलेल्या संस्कृत व्याकरण या ग्रंथाची 1790 मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या लॅटिन भाषेतील पुनर्मुद्रित प्रत सप्रेम भेट दिली. हा ग्रंथ भारत आणि क्रोएशिया यांच्यातील ऐतिहासिक बौद्धिक आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक मानले जात आहे. फिलिप वेझ्डिन (1748-1806) हे पहिले युरोपीय विद्वान होते ज्यांनी भारतातील भाषाशास्त्र आणि संस्कृतीवर सखोल अभ्यास केला. त्यांनी केरळमधील स्थानिक हस्तलिखितांवर आधारित हा ग्रंथ तयार केला होता.
पंतप्रधान प्लेंकोविच यांनी सोशल मीडियावर लिहिले, हा ग्रंथ भारत-क्रोएशिया यांच्यातील ऐतिहासिक सहकार्याचे प्रतीक आहे. आम्हाला अभिमान आहे की वेझ्डिन यांनी भारतात राहून केलेला अभ्यास आजही दोन्ही देशांच्या मैत्रीचे द्योतक ठरतो. पंतप्रधान मोदींनीही ’द’ वर प्रतिक्रिया देताना लिहिले, पंतप्रधान प्लेंकोविच, या अनमोल भेटीसाठी आपले मन:पूर्वक आभार. हे भारत आणि क्रोएशिया यांच्यातील दीर्घकालीन बौद्धिक आणि सांस्कृतिक नात्यांचे विलक्षण प्रतीक आहे. क्रोएशियन राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविच आणि पंतप्रधान प्लेंकोविच यांना पंतप्रधान मोदींनी भारताच्या समृद्ध कलासंस्कृतीचे प्रतीक म्हणून खास भेटवस्तू दिल्या. राष्ट्राध्यक्ष मिलानोविच यांना त्यांनी ओडिशाच्या सुप्रसिद्ध पटचित्र शैलीतील हस्तनिर्मित चित्र भेट दिले. ’पट्टा’ म्हणजे कापड आणि ’चित्र’ म्हणजे चित्रकला-या पारंपरिक शैलीत प्राचीन भारतीय कथा, देवता आणि दृष्य चित्रित केली जातात. त्याचबरोबर, त्यांनी चांदीची आकर्षक कंदीलदिव्यांची जोडी देखील भेट दिली, जी भारतीय हस्तकलेचे प्रतीक मानली जाते.
पंतप्रधान मोदींचा हा दौरा क्रोएशियाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला, कारण भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. क्रोएशियन पंतप्रधानांनी स्वागत करताना म्हटले की, हा दौरा दोन्ही देशांच्या राजकीय आणि आर्थिक सहकार्याच्या नवीन पर्वाची सुरुवात आहे. 2024 मध्ये भारत-क्रोएशिया व्यापार 242 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला असून, 2025 च्या पहिल्या तिमाहीत यामध्ये 10% वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, भारतातून येणार्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. या दौर्यात कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान, सांस्कृतिक देवाणघेवाण, विद्यापीठ सहकार्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या झाल्या.




