9 नक्षल्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडून भारताचे संविधान देऊन सत्कार

गडचिरोली/31 मार्च : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत देशातील माओवादी चळवळीचा अस्त झाल्याची घोषणा केल्यानंतर आज एकूण 30 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 9 नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी भारताचे संविधान देऊन त्यांचा सत्कार केला.
आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमधील इंद्रावती क्षेत्रिय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रिय समितीत कार्यरत होते. या 9 जणांपैकी तिघे जण क्षेत्रिय समिती सदस्य होते. त्यात दसरी उर्फ पिडे सन्नू वेको (वय 35), रामजी अडमा पोटाम ( वय 40) व शांती वज्जा वड्डे (वय 40) यांचा समावेश आहे. मनकू पोड्याम, सरिता वेलकम, लखमी कुंजाम, नंदे मडे, राकेश मज्जी व सुक्की कुंजाम अशी अन्य आत्मसमर्पित नक्षल्यांची नावे आहेत. मागील महिन्यात नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक 10 चा कमांडर प्रभाकरला ठार केल्यानंतर सध्या गडचिरोली जिल्ह्यात 6 सशस्त्र नक्षली शिल्लक आहेत. त्यातील जयराम गावडे हा एकमेव सदस्य गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असून, अन्य पाच जण छत्तीसगडचे रहिवासी आहेत. मात्र, त्यांच्या कुठल्याही हालचाली गडचिरोली जिल्ह्यात दिसत नाही, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितलं. या नक्षल्यांनी आत्मसमर्पण करावं, अन्यथा सशस्त्र कारवाईला सामोरे जावं लागेल, असा इशारा नीलोत्पल यांनी दिला.गडचिरोली जिल्ह्यात अलीकडच्या काही वर्षांत छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात 11 पोलिस मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात असे एकही संवेदनशील ठिकाण नाही जेथे आम्ही पोहचू शकत नाही.




