व्हिडिओमध्ये दिसणार्‍या तृतीयपंथीय व्यक्तीची स्वतःच्या भावाविरोधात गंभीर तक्रार

झिरवाळ व्हिडिओ प्रकरणात मोठा ट्विस्ट

मुंबई /31मार्च मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या तृतीयपंथीय व्यक्तीने स्वतःच्या भावाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे. भावाने ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स एकत्र करून बनावट व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.
या संदर्भात मुंबईतील कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तिच्या भावाने मुद्दामहून विविध क्लिप्स एडिट करून चुकीचा व्हिडिओ तयार केला. यामुळे तिच्या गोपनीयतेचा भंग झाला असून समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 79 आणि 351(1) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी तांत्रिक पातळीवरही चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा व्हिडिओ नेमका कसा तयार करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर कसा पसरवण्यात आला, याचा सखोल तपास केला जात आहे.काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत असल्याचा कथित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र, झिरवाळ यांनी सुरुवातीपासूनच हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला होता. वेगवेगळ्या क्लिप्स जोडून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.मुंबई पोलिसांकडून तपास सुरू-दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळ यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर येईल, असे त्यांनी सांगितले होते. सध्या मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या व्हिडिओमागील खरे वास्तव समोर येणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button