खरात सोबतचा बच्चू कडूंचा व्हिडीओ व्हायरल, भाजपचा कट असल्याचा आरोप
अमरावती जिल्ह्यात राजकीय खळबळ; बच्चू कडूंचे प्रत्युत्तर

जुना व्हिडिओ प्रसारित करून बदनामीचा मोठा डाव
अमरावती /24 मार्च – राज्याचे माजी मंत्री आणि अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू सध्या एका जुन्या चित्रफितीमुळे वादाच्या भोवर्यात सापडले असून, त्यांनी यामागे भारतीय जनता पक्षाचा मोठा कट असल्याचे म्हटले आहे. महादेव मंदिरामध्ये एका भोंदू बाबाच्या पाया पडतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी मंदिरात गेलो होतो, तिथे अशोक खैरात नावाचा हा भोंदू माणूस हजर होता. वयाने मोठा असल्याने आपल्या संस्कृतीनुसार मी त्याचे पाय शिवले, मात्र त्याचा अर्थ मी त्याच्या कृत्याचे समर्थन करतो असा होत नाही, असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, हा प्रकार मी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री असतानाचा आहे. सध्या संबंधित भोंदू बाबावर महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप आहेत, अशा वेळी केवळ माझीच चित्रफित बाहेर काढून मला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपच्या कार्यालयातून रचले जात आहे. या बाबाकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विखे पाटील हे सर्व दिग्गज नेते गेले होते, मग केवळ माझीच चौकशी का? असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे. भाजपला कोणाची ’सीडी’ कधी बाहेर काढायची हे चांगलेच ठाऊक आहे. मी गरीब असल्याने मला लक्ष्य केले जात आहे, परंतु अशा दबावाला मी बळी पडणार नाही. त्या बाबाचा आणि माझा कोणताही संबंध नसून, त्याच्या गैरकृत्याचा मी जाहीर निषेधच करतो, अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे. या प्रकरणाने अमरावतीच्या राजकारणात आता नवा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
नेत्यांची मांदियाळी पण लक्ष्य फक्त कडू?-या भोंदू बाबाच्या दरबारात राजयातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. सर्वच पक्षांचे नेते तिथे जाऊन आले असताना, केवळ प्रहारच्या नेत्यालाच लक्ष्य करून राजकीय सूड उगवला जात असल्याची चर्चा आता जनमानसात रंगू लागली आहे.




