ज्येष्ठ विदर्भवादी नेते दत्ता मेघे अनंतात विलीन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांची अंत्यसंस्काराला उपस्थिती

* दिग्गजांकडून लाडक्या नेतृत्वाला भावपूर्ण आदरांजली
पवनार /23 मार्च : सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, माजी खासदार तथा माजी राज्यमंत्री दत्ताजी मेघे यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या मूळ गावी पवनार येथे पंचतत्त्वात विलीन झाले.
अत्यंत शोकाकुल वातावरणात आणि पूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अखेरचा मानाचा मुजरा दिला. दत्ताजींच्या जाण्याने विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातील एक आधार वड कोसळल्याची भावना यावेळी जन सामान्यांमध्ये उमटत होती. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी पवनार परिसरात जनसागर लोटला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ताजींच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी राज्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि राज्यमंत्री अधिवक्ता आशिष जैस्वाल यांनीही उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. अंत्यविधीपूर्वी मान्यवरांनी मेघे कुटुंबाचे सांत्वन केले. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी दत्ताजींच्या पत्नी शालिनीताई मेघे, पुत्र सागर मेघे आणि आमदार समीर मेघे यांची भेट घेऊन या दु:खद प्रसंगी धीर दिला. गावखेड्यातील सामान्य माणसापासून ते दिल्लीच्या राजकारणापर्यंत आपला ठसा उमटवणारा हा नेता आज अनंतात विलीन झाला असला, तरी त्यांच्या कार्याची स्मृती या मातीत कायम जिवंत राहील.
कर्तृत्ववान लोकनेत्याचा प्रवास थांबला-शिक्षण आणि समाजकारणाच्या माध्यमातून हजारो हातांना काम देणारे दत्ताजी मेघे हे विदर्भाचे वैभव होते. पवनारच्या धाम नदीकाठी त्यांच्यावर झालेल्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. एका मोठ्या पर्वाचा आज खर्या अर्थाने शेवट झाला आहे.




