जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला मिळणार नवसंजीवनी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत मंत्रालयात झाली बैठक

* आ.संजय खोडके व आ.सुलभाताई खोडके यांची उपस्थिती

मुंबई /18 मार्च सद्या मुंबई येथे सुरु असलेल्या राज्यविधि मंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये आ.सौ. सुलभाताई खोडके व आ.संजय खोडके यांनी अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अनेक मुद्दे उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले. त्याअनुषंगाने उपाययोजना व आरोग्य सुविधांची सक्षमतेने अंमलबजावणी करण्याला घेऊन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाशजी आबिटकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार संजय खोडके, आमदार सौ. सुलभाताई खोडके, आरोग्यसेवा आयुक्त – कादंबरी बलकवडे, आरोग्यसेवा संचालक डॉ. विजय कांदेवाड तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय तसेच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय यासह ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना अधिक बळकटी देण्यास रुग्णाला आवश्यक सुविधा तत्परतेने पुरविण्यासंदर्भात तसेच जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका सेवेतील तांत्रिक अडचणी आणि इतर प्रलंबित प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, हा बैठकीमागचा मुख्य उद्देश होता. या बैठकीत प्रामुख्याने स्पर्श प्रणालीमधील त्रुटी, चिखलदरा आणि धारणी येथील इंधन पुरवठ्याबाबतचे प्रश्न तसेच रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेविषयी सखोल चर्चा करण्यात आली. धारणी आणि चिखलदरा सारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवा विनाखंड सुरू राहण्यासाठी मानधनाचे प्रलंबित विषय तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांच्या वतीने संबंधित विभागाला देण्यात आल्या. तपोवन कुष्ठरोग संस्थेच्या अहवालाबाबत आणि तेथील सुधारणांबाबतही बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button