मद्यधुंद चालकांमुळे रस्ते बनले ‘मृत्युपाश’
पाऊण वर्षात ’हिट अँड रन’ची भीषण हॅट्टिक

* पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात
अमरावती / 17 मार्च – शहरात आता केवळ रात्रच नव्हे, तर दिवसाही रस्ते सुरक्षित राहिलेले नाहीत. रस्त्यांच्या ठिकठिकाणी मृत्यूने आपले जाळे विणले आहे. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. गेल्या पाऊण वर्षात शहरात एकापाठोपाठ एक घडलेल्या तीन मोठ्या घटनांनी ही भीती अधिक गडद केली आहे. रविवारी मध्यरात्री ’न्यू एक्सप्रेस हायवे’वर झालेल्या एका भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातालाही चालकाची नशा आणि अतिवेग कारणीभूत असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जुन्या बायपास रोडवरील एमआयडीसी चौक परिसरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणार्या एका व्यक्तीने समोरून जाणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील वडील आणि मुलीचा जागीच अंत झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. राजापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक पूर्णपणे नशेत होता आणि कारचा वेग ताशी 130 ते 150 किमी होता. या धडकेत दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.




