अमरावतीत गॅस एजन्सीला पोलिस संरक्षण

सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, साठा पुरेसा असल्याचा सरकारचा दावा

अमरावती/12 मार्च – खाडी देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती एलपीजी सिलिंडरचा पुरवठा खंडित होणार असल्याच्या अफवांनी अमरावती शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत असून, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तब्बल 40 केंद्रांवर पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एकीकडे नागरिक सिलिंडरसाठी तासनतास रांगेत उभे असताना, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) चे संचालक प्रा. रविकांत कोल्हे यांनी पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात घरगुती सिलिंडरचा मुबलक साठा उपलब्ध असून बुकिंग केल्यानंतर अवघ्या अडीच दिवसांत सिलिंडर घरपोच मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजकीय पक्षांनी विनाकारण हवा दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक रिफिलिंगसाठी गर्दी करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरातील अंबादेवी रोडवरील देशमुख गॅस एजन्सीसह अनेक ठिकाणी गुरुवारी सकाळपासूनच शेकडो नागरिक कामाधंदे सोडून रांगेत उभे होते. अनेक ग्राहकांनी असा आरोप केला आहे की, पैसे भरूनही तत्काळ सिलिंडर मिळत नसून 4 ते 5 दिवसांनंतरचे ’गेट पास’ हातावर टेकवले जात आहेत. यामुळे गृहिणींसमोर स्वयंपाकाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

व्यावसायिक सिलिंडरचा काळाबाजार

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ झाल्याने आणि पुरवठा मर्यादित केल्याने हॉटेल व्यावसायिक व केटरर्स अडचणीत आले आहेत. लग्नसराईचा हंगाम असल्याने 2 हजार रुपयांचे सिलिंडर 3 हजार रुपयांना विकले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात पुढील 8 ते 10 दिवसांचा गॅस साठा शिल्लक असून कुणीही घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button