हिवरखेड परिसरात पट्टेदार वाघाचा आतंक

रात्रीच्या अंधारात सहा जनावरांची शिकार

शेतमजुराचा मृत्यूशी झुंज; खोलीत वाचवला जीव

अमरावती / 12 मार्च : हिवरखेड नजीकच्या सौंदळा शिवारात एका पट्टेदार वाघाने मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या भीषण हल्ल्यात पाच पाळीव प्राण्यांसह एका रानडुकराचा बळी गेला आहे. शेतकरी बाळकृष्ण मनोहर जवंजाळ यांच्या वारखेड शेत शिवारात ही थरारक घटना घडली. वाघाच्या या दहशतीने संपूर्ण परिसर हादरून गेला असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भयावह घटनेचे साक्षीदार शेतमजूर दादाराव कांबळे यांनी हा मृत्यूचा खेळ डोळ्यांनी पाहिला. वाघाला समोर पाहताच त्यांनी जिवाच्या आकांताने शेतातील खोलीत धाव घेऊन स्वतःला कोंडून घेतले, त्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. वाघाने हल्ला चढवल्यानंतर दोन गाई, एक मोठा गोरा आणि दोन पाळीव कुत्र्यांनी रानडुकरासोबत एकत्र येत वाघाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या क्रूर शिकारीसमोर कोणाचाही निभाव लागला नाही. वाघाने कुत्र्यांचे केवळ अवशेष उरतील अशा पद्धतीने शिकार केली, तर गोर्‍याचा अर्धा भाग फस्त केला. सौंदळ्याचे पोलीस पाटील राजेंद्र चणेकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाला पाचारण केले असून, सध्या वनविभागाचे पथक घटनास्थळी पंचनामा करत आहे.
मृत्यूचा थरार अनुभवणारा प्रत्यक्षदर्शी-रात्रीच्या वेळी वाघाची डरकाळी आणि जनावरांचा हंबरडा ऐकून दादाराव कांबळे सुन्न झाले होते. त्यांनी खोलीचे दार घट्ट लावून घेतल्यामुळे वाघ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. सुमारे दोन हजार फूट परिसरात रक्ताचे सडे आणि जनावरांचे अवशेष विखुरलेले असून, हा परिसर आता मृत्यूचे मैदान भासत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button