वाशिममध्ये सामूहिक कॉपीचा धुराळा
पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई

* दोषी शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार
वाशिम / 17 फेब्रुवारी – शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात उघडकीस आली असून, इयत्ता बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेत तब्बल 581 विद्यार्थी सामूहिकरीत्या कॉपी करताना रंगेहात पकडले गेले आहेत. अमरावती विभागीय मंडळाच्या इतिहासातील हे आजवरचे सर्वात मोठे कॉपी प्रकरण मानले जात असून, यामध्ये केवळ विद्यार्थीच नव्हे तर परीक्षा केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारीही संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत. जिल्हाधिकारी योगेश कुंभोजकर यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत 21 कर्मचार्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 5 केंद्र संचालक, 2 सहाय्यक संचालक आणि 14 पर्यवेक्षकांचा समावेश आहे. शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या भरारी पथकाने जुमडा फाटा येथील टोकी मॅनेजरी महाविद्यालयात धाड टाकली असता, हा सर्व प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे, 581 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या असता सर्वांची उत्तरे अक्षरशः सारखीच असल्याचे आढळल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या परीक्षा केंद्रावर नियमांची पायमल्ली करून पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसवण्यात आले होते. तिथे ना पुरेशी प्रकाश व्यवस्था होती, ना सीसीटीव्हीचा पहारा. भरारी पथकाने कारवाईदरम्यान एका कर्मचार्याकडून दोन भ्रमणध्वनी संचही जप्त केले आहेत. यापूर्वी इंग्रजीच्या पेपरमध्येही वाशिममध्ये सर्वाधिक 21 विद्यार्थी कॉपी करताना आढळले होते, त्यामुळे महसूल विभाग पहिल्यापासूनच सतर्क होता. आता या सर्व दोषींवर निलंबनासह गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अमरावती मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगळे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तातडीने मागवला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, कॉपी बहादरांचे आणि त्यांना साथ देणार्या शिक्षण सम्राटांचे धाबे दणाणले आहेत.
शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड-या प्रकरणाने संपूर्ण अमरावती विभागात खळबळ उडवून दिली आहे. एकाच केंद्रावर 581 विद्यार्थ्यांची उत्तरे सारखीच असणे, ही बाब संघटित कॉपीचा पुरावा आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभोजकर यांनी 21 कर्मचार्यांच्या हकालपट्टीचे संकेत दिल्याने आता शिक्षण क्षेत्रातील भ्रष्ट साखळीचे कंबरडे मोडणार हे निश्चित आहे.




