घातपाताचा कट उधळला
‘जैश’च्या दहशतवाद्याचा खात्मा

नवी दिल्ली /23 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाची देशभरात जय्यत तयारी सुरू असताना, सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला. जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये चकमकीत जैश ए मोहम्मद या संघटनेच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. जम्मूचे आयजीपीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिलावर परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी हे बिलावर परिसरातील घनदाट जंगलात लपून बसले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि सीआरपीएफनं घेराव घातला. जंगलाला चहुबाजूने वेढा घातला. त्यामुळं दहशतवाद्यांचे पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले. बिलावर परिसरात संयुक्त मोहीम राबवण्यात आली. सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला, अशी माहिती जम्मू रेंजचे पोलीस महानिरीक्षक भीम सेन टुटी यांनी दिली. जम्मू पोलिसांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट शेअर केली.




