गुरुवारी राज्यातील महापालिकांच्या महापौरांची आरक्षण सोडत

मंत्रालयात आयोजन

* दिग्गजांची धाकधूक वाढली

मुंबई/19 जानेवारी : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ’शहराचा प्रथम नागरिक’ कोण होणार, याकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची अधिकृत सोडत गुरुवार, 22 जानेवारी 2026 रोजी मंत्रालयात काढली जाणार आहे. नगर विकास विभागाच्या पत्रानुसार, ही सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी 11.00 वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीचे महापौरपद निश्चित केले जाणार आहे.मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये आरक्षणाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावरच अनेक राजकीय दिग्गजांचे महापौर होण्याचे स्वप्न अवलंबून आहे. जर एखाद्या पालिकेत खुल्या प्रवर्गाचे आरक्षण आले, तर चुरस अधिक वाढण्याची शक्यता आहे. या सोडतीसाठी नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून, राज्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांना या नियोजनाची माहिती देण्यात आली आहे. 22 जानेवारीच्या दुपारपर्यंत राज्यातील 29 शहरांच्या महापौरपदाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अशी असेल ’महापौर’पदाची आरक्षण सोडत महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निघणार आहे. मागील 20 वर्षांचं आरक्षण लक्षात घेतलं जाणार आहे. याआधी होतं, ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी असणार आहे. त्या महापालिकेमध्ये याआधी कोणतं आरक्षण झालेलं आहे, ती चिठ्ठी बाजूला करुन उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जाणार आहेत. या चिठ्ठ्या बॉक्समध्ये टाकताना सर्वांना दाखवल्या जातील, त्यानंतर पारदर्शक असणार्‍या बॉक्समध्ये त्या टाकल्या जातील. त्या सर्व चिठ्ठ्या एकत्र झाल्यानंतर त्यातून एक-एक चिठ्ठी बाहेर काढून आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पुन्हा 50 टक्के महिला आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकून महिला आरक्षण काढलं जाणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button