अमरावतीत सराफा दुकानांवर आयकर विभागाचे छापे
अकोला, परतवाडा येथेही कारवाई

-सराफा वर्तुळात खळबळ
अमरावती / 14 मे: आयकर चोरीच्या संशयावरून आज नागपूर इथल्या आयकर विभागाच्या अधिकार्यांनी अमरावतीसह अकोला आणि परतवाडा येथील प्रसिद्ध ’ज्वेलर्स’ दुकानांवर छापेमारी केली आहे. सकाळपासून सुरू झालेली ही कारवाई संपूर्ण दिवसभर सुरू होती. या तीनही ठिकाणच्या दुकानांचे मालक एकच असून, मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार आणि बेहिशोबी संपत्तीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या धाडीमागील नेमकं करण काय? आणि यामध्ये काय घबाड बाहेर येईल? हे तपासणीनंतर कळू शकणार आहे.
आयकर विभागाच्या एकूण 5 ते 6 पथकांनी संयुक्तपणे ही धाड टाकली. धाडीत महत्त्वाचे कागदपत्रे, संगणकीय रेकॉर्ड्स, हिरे आणि सोन्याचे साठे मोठ्या प्रमाणातील रोकड जप्त केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधी आयकर विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांमध्ये या कारवाईमुळं खळबळ उडाली आहे. अमरावती, अकोला, परतवाडा येथील सराफा दुकानावर आयकर विभागाच्या धाडी पडल्यानंतर शहरातील सराफा दुकान पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. या कारवाईमुळं इतर अनेक दुकानदारांनी आपले व्यवहार तातडीने बंद केले आहे. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष गैरव्यवहाराचे स्वरूप स्पष्ट होईल, असे आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.
अकोल्यात शहरातील चार नामांकित सराफा पेढी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. त्या सराफा पेढ्यांवर छापा कारवाई करण्यात आली आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकांतील अनेक अधिकारी व कर्मचार्यांनी सराफा पेढ्यांवर एकच वेळी छापा कारवाई केली.