घर संसार दुकानाला आग, लाखो रुपयांचे नुकसान
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अग्नितांडव

* गांधी चौकातील घटना
अमरावती /31 डिसेंबर – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील गांधी चौक परिसरात भीषण आगीची घटना घडली. बुधवार रात्री सुमारे बारा वाजताच्या सुमारास गांधी चौकातील महालक्ष्मी घरसंसार दुकानाला अचानक आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार बंब घटनास्थळी दाखल झाले. आग वेगाने पसरत असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन कर्मचार्यांना मोठी कसरत करावी लागली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
घटना घडली त्या वेळी नववर्षाचे स्वागत सुरू असल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. एकीकडे नववर्षाचा उत्साह तर दुसरीकडे आगीचे रौद्र रूप पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना रस्त्यावरील नागरिकांना हटवावे लागले. सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक कोटनाके हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र या अचानक घडलेल्या आगीमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही दुकान अनेक वर्षांपासून सुरू असून ती रवी ढोके यांच्या मालकीची आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याबाबत तपास सुरू आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून व्यापार्यांमध्येही चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.




