पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी

फुट पडल्यानंतर पहिल्यादाच अजितदादा, शरद पवार एकत्र

चिन्हाच्या वादावर निघाला तोडगा

पुणे /29 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील आघाडीबाबत मोठी अनिश्चितता होती. कधी आघाडी होणार, तर कधी ती तुटल्याच्या बातम्या येत होत्या. आज या सर्व नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असून दोन्ही राष्ट्रवादींमधील आघाडीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चिन्हाबाबतची अट मान्य केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महा पालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार आपापल्या अधिकृत चिन्हांवर – ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’- निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यामुळे चिन्हांवरून सुरू असलेला वादही संपुष्टात आला आहे.
पक्ष फुटण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह घड्याळ होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी पक्ष फुटल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला घड्याळ चिन्ह दिले आणि शरद पवारांनी नवीन चिन्ह तुतारी स्वीकारले. त्यामुळे काका-पुतण्या जोडी दोन वर्षांनंतर पुन्हा एकत्र निवडणूक लढवणार आहे. 2023 मध्ये पक्ष फुटल्यानंतर अजित पवार भाजपच्या नेतृत्वाखालील महा युतीत सामील झाले होते, तर शरद पवारांचा गट महाविकास आघाडीचा भाग होता. पुणे हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर पिंपरी-चिंचवड ही सर्वात समृद्ध महानगरपालिका आहे. 2017 पासून राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा ताब्यात ठेवली आहे, त्यामुळे अजित आणि शरद पवार यांनी पक्ष फुटल्यानंतरही एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक रॅलीत अजित पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांना कठोर परिश्रम करण्याचे आणि वादग्रस्त विधान टाळण्याचे निर्देश दिले. पुणे महापालिका निवडणुकीसाठी सुरुवातीला शरद पवारांच्या पक्षाने आघाडीत 65 जागांची मागणी केली होती, तर अजित पवार यांच्या पक्षाकडून 35 जागांची तयारी दर्शवण्यात आली होती. मात्र, दीर्घ वाटाघाटीनंतर अखेर जागावाटपावर तोडगा निघाला असून पुणे महापालिकेत अजित पवार यांचा पक्ष 125 जागा, तर शरद पवार यांचा पक्ष 40 जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच आघाडीचा अंतिम फॉर्म्युला असणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button