बस अपघातात 17 जणांचा होरपळून मृत्यू

साखरझोपेतील प्रवाशांवर काळाचा घाला

* कर्नाटकातील चित्रदुर्ग राष्ट्रीय महामार्ग घटना

कर्नाटक /25 डिसेंबर : देशभरात नाताळ सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. 25 डिसेंबरला मध्यरात्री नाताळ सणाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे मात्र, कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्ग 48 वर पहाटे 3 वाजता झालेल्या अपघातात 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
या घटनेमुळे देशभरातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियुर तालुक्यातील गोरलाथू क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग 48 वर बेंगळुरूच्या दिशेने जाणारा एक मालवाहू ट्रक नियंत्रणाबाहेर गेला आणि त्याने दुभाजक ओलांडून बेंगळुरूहून शिवमोग्गाकडे जाणार्‍या खासगी स्लीपर बसला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे एक मालवाहू ट्रक हिरियुरहून बेंगळुरूच्या दिशेने जात होता. याचवेळी या ट्रकच्या चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटले आणि हा ट्रक राष्ट्रीय महामार्ग 48 वरील गोरलाथू क्रॉसजवळ दुभाजक ओलाडूंन दुसर्‍या बाजूला गेला. याचवेळी एक खासगी स्लीपर बस बेंगळुरूहून शिवमोग्गाकडे जात होती. या बसला या नियंत्रणाबाहेर गेलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ज्यानंतर बसमधून डिझेल टँकमधून डिझेलची गळती होऊ लागली आणि बसने पेट घेतला. यावेळी बसमधून 35 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. तर पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी हे साखर झोपेत असताना या प्रवाशांवर काळाने घाला घातला. धडक इतकी भीषण होती की, बसने महामार्गाच्या मध्यभागीच पेट घेतला. बस स्लीपर कोच असल्याने आणि प्रवाशांना बाहेर पडायला मार्ग न मिळाल्याने अनेकजण आतच अडकून पडले. आगीचे स्वरूप अतिशय भीषण असल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा अधिकृत आकडा ऑडिट पूर्ण झाल्यानंतरच जाहीर केला जाईल. जे प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, त्यापैकी अनेकजण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्राथमिक तपासात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे समोर येत आहे. चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रणजित यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग 48 वरील वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली होती. हिरियुर ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button