माणिकराव कोकाटेंना त्वरीत अटक करा
न्यायालयाचे पोलिसांना आदेश

नाशिक /17 डिसेंबर : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला असून आता त्यांना कधीही अटक होऊ शकते. न्यायालयाने कोकाटेंविरोधातील निकाल कायम ठेवला असून कोकाटेंना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या बंधूंनाही अटक करण्यात येणार आहे. कोकाटेंनी पोलिसांना शरण यावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. परंतु, कोकाटे हे सध्या रुग्णालयात असल्याचे त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले. परंतु, कायद्यासमोर कोणीही मोठे नसल्याचे सांगत न्यायालयाने कोकाटेंना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक उच्च न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांनी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यानंतर या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर कोकाटेंना त्वरीत अटक करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. माणिकराव कोकाटे यांनी त्वरीत पोलिसांसमोर हजर व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता कोकाटे स्वतः हजर होतात की त्यांना अटक करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यापल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत खातेबदल पत्रावर मंजुरी दिली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे. माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांकडे आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर, सर्व घडामोडी वेगाने घडल्या आहेत.
मंत्री कोकाटेंविरोधात अटक वॉरंटचा अर्ज करणारे अर्जदार आशुतोष राठोड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, न्यायालयाने कोकाटेंना अटक करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कोकाटेंविरोधात अटकेचे आदेश पारित झाले आहेत. त्यांनी त्वरीत पोलिसांना शरण व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पण न्यायालयात कोकाटेंच्या वकिलांनी सांगितले की, कोकाटे रुग्णालयात दाखल आहेत. पण त्याचा कोणताही पुरावा देण्यात आला नाही. त्याचवेळी पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, कॅबिनेट मिटिंगमध्ये ते होते. नगरपालिकांच्या रॅलीमध्ये ते होते. आता मंत्रालयात मुंबईत आहेत. त्यामुळे तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे, ती न्यायालयाने अमान्य केली आहे.




