राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा, आचारसंहिता लागू

* जात वैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत
* 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरणार
* 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल

मुंबई/15 डिसेंबर – राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (15 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे.
दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, आजच्या पत्रकार परिषदेत मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्यासाठी करण्यात आलेली कार्यवाही याबाबत माहिती देण्यासाठी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद असून 29 पैकी 27 महापालिकेची मुदत संपलेली आहे, तर 5 महापालिकेची मुदत 2020 मध्येच संपलेली होती. तसेच 18 महापालिकांची मुंबईसह 2022 मध्ये मुदत संपलेली होती. तसेच 4 महापालिकांची मुदत 2023 मध्ये संपलेली आहे. त्यामुळे या सर्व निवडणुकांसोबतच जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे. महापालिका निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावे लागणार आहे.

खर्चाची मर्यादा किती?

अ वर्ग –        15 लाख
ब वर्ग –        13 लाख
क वर्ग –       11 लाख
ड वर्ग –         9 लाख

असा असेल निवडणूक कार्यक्रम

अर्ज दाखल करण्याची मुदत –                 23 ते 30 डिसेंबर
अर्जांची छाननी –                                   31 डिसेंबर 2025
अर्ज मागे घेण्याची मुदत –                       2 जानेवारी 2026
चिन्ह वाटप/उमेदवारी अंतिम यादी –        3 जानेवारी 2026
मतदानाची तारीख –                              15 जानेवारी 2026
मतमोजणी –                                        16 जानेवारी 2026

जिल्हा परिषद निवडणुकाही लवकरच

पत्रकार परिषदेत आयुक्त म्हणाले आहेत की, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानुसार, ज्या जिल्हा परिषद पंचायत समितींचे 50 टक्क्यांच्या आत आरक्षण आहे, तिथे निवडणूक घ्या. पण, अशा फक्त 12 जिल्हा परिषद आहेत. या 12 जिल्हा परिषदांचे नियोजन आम्ही करत आहोत. पण आमची अडचण अशी आहे की, जशा विधानसभा किंवा लोकसभांच्या निवडणुका असतात त्यापेक्षा गुंतागुंतींच्या निवडणुका असतात. अशावेळी अधिकार्‍यांची कमतरता भासत असून आम्ही ते नियोजन करत आहोत. त्यानंतरच आम्ही जिल्हा परिषद निवडणुका घेऊ शकतो. आम्हाला 31 जानेवारी पूर्वी या निवडणुका घ्यावाच लागणार आहेत. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button